लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात येईल. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणात SIT पथकाची नेमणूक केली आहे. मिठी नदीतला गाळ उपसण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत होता. यावर कारवाई करत आता राज्य सरकराने SIT ची स्थापना करून याप्रकरणी चोकशीचे आदेश दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण तुरुंगात होते. आता, मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणातील गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर मुंबई पोलिस आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाच्या गैरव्यवहारात कंत्राट कोणाला दिली, किती पैसे कुठे खर्च करण्यात आले, 2005 ते 2023 पर्यंत किती गाळ काढण्यात आला, किती सौंदर्यीकरण करण्यात आले? या सर्व कामाची चौकशी केली जाणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या 3 कंत्राटदारांना समन्स देखील बजावले आहे.
दरम्यान, गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व असून यंदा मात्र, मिठी नदीचं हे प्रकरण त्यांच्या अंगावर येऊ शकतं. व यंदाच्या महापालिका निवडणुकीत याचे वाईट परिणाम दिसून येऊ शकतात.