पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये बलात्कार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पीडित २६ वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आलीअसता तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही, तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. आणि तिच्या पाठोपाठ स्वतः त्या बस मध्ये शिरत त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.आता पोलिसांकडून सध्या या शिवशाही बसची तपासणी सुरु आहे. या बसमध्ये पोलिसांना काही पुरावे मिळतात का, हे पोलिस बघत आहेत. तसेच पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून माहिती समोर येणार आहे.
तपासादरम्यान आरोपीचे नाव समोर आले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या भावाकडे त्याची चौकशी सुरु केली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील शिरुर पोलीस स्थानकात या आधी चोरी आणि चेन स्नॅचींग यासारख्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
खरेतर पुणे हे विद्येचे माहेरघर समजले जाते. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे ही घडलेली घटना अत्यंत धक्कादायक असून आता पुण्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.