पुण्यात वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. मात्र या प्रकरणाचा तपास सुरु झाल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर यायला सुरवात झाली आहे.
दत्तात्रय गाडे याने एकवेळा नव्हे तर दोनवेळा तरुणीवर बलात्कार केला आहे. ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर काही गुन्हांची नोंद असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच आरोपी दत्तात्रय गाडे हा रात्री दीड ते दोन वाजल्यापासून स्वारगेट आगारात फिरत होता. सीसीटीव्हीमधून हे स्पष्ट होत आहे की, गाडे हा स्वारगेट आगारात रात्रीच दाखल झाला होता आणि तो फिरताना स्पष्ट दिसून आला आहे.
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट मधील २३ सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यसरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
तसेच बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.