पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील मोठी बातमी आज समोर आली आहे. बलात्कार प्रकरणातील नराधमाला अखेर अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली आहे .तसेच आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी या अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आरोपी लपून बसला असता पोलिसांनी विविध तंत्रज्ञानांचा वापर करत अखेर शोधून काढत अटक केली. या घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल असे ते म्हणाले आहेत. तसेच काही माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. पण, आणखी जास्त माहिती या क्षणी देणं योग्य नाही. त्यामुळं योग्य वेळी ती माहिती आपणापर्यंत पोहोचेल’, असं ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
आता पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. त्यानंतर आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच आरोपीची चौकशी होईल. तसेच काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेल्या आहेत. तसेच काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेल्या आहेत. याची सर्व माहिती एकत्र करून याबाबत बोलणं योग्य राहील”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
या दुर्दैवी घटनेबाबत बोलतांना ही घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. त्यावेळी बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले होते. या विधानानंतर विरोधकांनी टीकेची राळ उठवली होती. त्याबाबत विचारले गेले असता मुख्यमंत्री फडणवीसांनी कदम नवीन मंत्री आहेत. कदाचित त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असेल. त्यामुळे माझा त्यांना सल्ला असेल की, अशा प्रकरणात बोलताना आपल्याला अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर चुकीचा परिणाम होतो. असा सल्लाही त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे.