भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 12 व्या सामन्यात भारतीय संघाने 44 धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताला पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आला आहे. या सामन्यात भारताने प्रथम 249 केल्या. ज्याचा पाठलाग न्यूझीलंड संघाला करता आला नाही न्यूझीलंडचा संघ 205 धावांवरच ऑलआऊट झाला. अशास्थितीत भारताने 44 धांवांनी न्यूझीलंड विरुद्ध विजयाची नोंद केली.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत आपला बॉलिंगचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. अशास्थितीत भारतीय संघांची सुरुवात खराब झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फॉर्मात असलेला फलंदाज शुभमन गिल देखील यावेळी चालला नाही. खेळाडूने फक्त दोनच धावा केल्या आणि तंबूत परतला. त्याच्या पाठोपाठ रोहित शर्मालाही जास्त धावा करता आल्या नाहीत. दुसरीकडे विराट कोहली देखील अवघ्या 11 धावांवर तंबूत परतला.
मात्र, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी भारतीय संघांची पुढील कमान सांभाळली आणि चौथ्या विकेटपूर्वी त्यांनी 98 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने 42 धावा केल्या तर अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 79 धावा केल्या. पुढे हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात 45 धावा केल्या. अशास्थितीत भारताने 9 विकेट गमावून 249 धावा केल्या. आणि न्यूझीलंड संघासमोर मोठ्या धावांचे आव्हान उभे केले.
फलंदाजीत न्यूझीलंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. फक्त 49 धावसंख्यावर दोन फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर केन विल्यमसनने पुढील धुरा सांभाळली आणि धावा करत राहिला. मात्र, या काळात इतर कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. विल्यमसन हा संघाकडून सर्वाधिक धावा करणारा एकटा खेळाडू ठरला. त्याने 81 धावा केल्या.
या डावात भारतीय गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्ती चमकला. वरुण चक्रवर्तीने फक्त 42 धावांत न्यूझीलंड संघाचे पाच फलंदाज बाद केले. भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर ऑलआऊट झाला. आणि टीम इंडियाला शानदार विजय नोंदवता आला. आता टीम इंडिया 4 मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे.