महिला दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीतील महिलांना सरकारने मोठी भेट दिली आहे. दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात लवकरच २५०० रुपये येणार आहेत. या योजेनला आज मंत्रिमंडळाची मंजूर मिळाली आहे. सरकारने एका वर्षासाठी ५,१०० कोटी मंजूर केले आहेत. अशास्थितीत लवकरच दिल्लीच्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
याविषयी माहिती देताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, “आज महिला दिन आहे. आज आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आमच्या मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिली आहे. दिल्ली निवडणुकीदरम्यान भाजप सरकारने महिलांना २५०० रुपये देण्याचे वचन दिले होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही दिल्लीच्या अर्थसंकल्पात ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आम्ही समिती स्थापन केली आहे, ज्याचे नेतृत्व मी करेन आणि या योजनेसाठी नोंदणी लवकरच सुरू होईल. तसेच यासाठी नवीन पोर्टल लवकरच सुरू केले जाईल. असंही यावेळी त्या म्हणल्या आहेत.
खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक आश्वासनांपैकी एक महिला समृद्धी योजना आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिल्लीतील महिलांना मासिक भत्ता म्हणून 2,500 रुपये मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असणाऱ्या महिलांना मिळणार आहे.
दिल्ली महिला समृद्धी योजना मध्य प्रदेशातील लाडली बहन योजना आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसारखीच आहे. जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.