आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफवर आपले नाव कोरले आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या वर्षभरात दुसरे आयसीसी विजेतेपद पटकावले आहे. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंड संघासोबतचा २५ वर्षे जुना बदला घेतला आहे. तसेच भारताने १२ वर्षांनंतर पुन्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.
न्यूझीलंड संघाने दिलेल्या 252 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. मात्र, यानंतर लागोपाठ भारताला तीन धक्के बसले. मात्र, त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्या जोडीने चांगली कामगिरी केली. दोघांनी 61 धावांची भागीदारी केली व टीम इंडियाला विजयाच्या आणखी जवळ नेले. शेवटी रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी भारताला विजय मिळवून दिला.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावा केल्या, श्रेयस अय्यरने 48, केएल राहुलने नाबाद 34 आणि शुभमन गिलने 31 धावा केल्या.
https://twitter.com/BCCI/status/1898785831726485880
दुबईमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा डॅरिल मिशेलने घेतल्या. ज्याने 101 चेंडूत 63 धावा केल्या. मिचेलशिवाय मायकेल ब्रेसवेलने 40 चेंडूत 53 धावा केल्या. हे दोन्ही खेळाडू बाद होताच न्यूझीलंडच्या फलंदाजीवर दबाव आला. भारतीय फिरकीपटूंनी जबरदस्त गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.