ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाचे कौतुक करत पंतप्रधान मोदींनी असामान्य कामगिरी म्हंटले आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “एक असामन्य कामगिरी आणि त्याचा असामन्य निकाल! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल क्रिकेट संघांचा अभिमान वाटतोय. त्यांनी पूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. शानदार खेळ केल्याबद्दल आपल्या संघाचं खूप खूप अभिनंदन”, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
An exceptional game and an exceptional result!
Proud of our cricket team for bringing home the ICC Champions Trophy. They’ve played wonderfully through the tournament. Congratulations to our team for the splendid all round display.
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2025
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी दुबई येथे न्यूझीलंड संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 49 षटकात 6 विकेट गमावत 254 धावा करत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंड संघासोबतचा २५ वर्षे जुना बदला घेतला आहे. तसेच भारताने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.
भारतीय खेळाडूंची कामगिरी….
न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. मात्र, यानंतर लागोपाठ भारताला तीन धक्के बसले. मात्र, त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्या जोडीने चांगली कामगिरी केली. दोघांनी 61 धावांची भागीदारी केली व टीम इंडियाला विजयाच्या आणखी जवळ नेले. शेवटी रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी भारताला विजय मिळवून दिला.
भारतीय गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केली. भारतीय फिरकीपटूंनी जबरदस्त गोलंदाजी करत न्यूझीलंड संघावर
सुरुवातीपासूनच दबाव आणला. ज्यामुळे न्यूझीलंड संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.