भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलनंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. रोहित शर्माने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर यावर भाष्य केलं आहे.
फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करत मिळवलेल्या विजयानंत रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला की, “मी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेत नाही. अशा अफवा पसरवू नका सध्या जसे चाललं आहे तसंच चालू राहील.’ असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
रोहितने 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत तो चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकदिवशीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता स्वतः खेळाडूने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव करून भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ICC Champions Trophy चे विजेतेपद पटकावले आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तर, भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली.