भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्या. राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर यांच्या सुखरूप आगमनानंतर त्यांचे अभिनंदन केले आहे.
खरं तर, अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिच्या सहकाऱ्यांसह फक्त आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात संशोधनासाठी गेल्या होत्या, परंतु त्यांच्या बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांच्या २८६ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागले. बुधवारी सकाळी सुनीता विल्यम्स सुखरूप परतल्या. जगभरातील लोकांनी आनंद व्यक्त केला यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
बुधवारी, अभिनेते आर. माधवन, जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि मानुषी छिल्लर यांसारख्या अभिनेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सुनीता विल्यम्ससाठी खास पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. आर माधवनने सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर परतण्याचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, “आमच्या प्रिय सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर स्वागत आहे. आमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले आहे. तुम्हाला सुरक्षित आणि हसतमुख पाहून खूप आनंद झाला. देवाचे आशीर्वाद असो. लाखो लोकांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले आहे.” नासा आणि स्पेसएक्सला टॅग करत आर माधवन म्हणाले की, संपूर्ण नासा टीमने उत्तम काम केले.
अभिनेता जॅकी श्रॉफने सुनीता विल्यम्सचा फोटो त्याच्या एक्स अकाउंटवर शेअर करून त्यांचे कौतुक केले आहे. “अंतराळात नऊ महिने घालवण्यासाठी संयम आणि शोध घेण्याची वृत्ती आवश्यक आहे,” असे म्हंटले आहे. हे लिहिल्यानंतर त्याने सुनीता विल्यम्स यांना टॅग केले आहे. .
अभिनेता चिरंजीवीनेही X वर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले आहे की , “सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर पुन्हा स्वागत आहे. अशा प्रकारे घरी परतणे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे. तुम्ही आठ दिवस अंतराळात गेलात आणि पृथ्वीभोवती ४,५७७ प्रदक्षिणा पूर्ण करून २८६ दिवसांनी परतलात,” असे चिरंजीवी यांनी या अंतराळवीरांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, अंतराळवीरांचा हा प्रवास एक रोमांचक आणि आतापर्यंतची सर्वात मोठी साहसी कहाणी आहे.
मानुषी छिल्लरनेही एक पोस्ट शेअर केली आणि सुनीता विल्यम्सला शुभेच्छा दिल्या. त्यांनी असेही लिहिले की सुनीता विल्यम्ससारख्या महिलांना नेहमीच प्रेरणा म्हणून पाहिले पाहिजे. यासोबतच अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने इंस्टाग्रामवर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अंतराळातील एक फोटो शेअर केला आहे. फोटोखाली सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना टॅग करून, अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आणि लिहिले आहे की , “तुमचा अंतराळ प्रवास तुमच्या शक्ती आणि समर्पणाची परीक्षा होती, तुम्ही इतिहास रचला आहे. तुम्ही जे साध्य केले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही आम्हाला अश्याच प्रेरणा देत राहाल.”
पॅलेस्टाईन आणि इस्त्राएल दरम्यानच्या युद्धादरम्यान युद्धग्रस्त निर्वासितांसाठी असलेल्या शिबिरावर इस्राएलने बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर ‘All Eyes on Rafah’ (ऑल आईज ऑन रफाह) ह्या इस्राईल वर टीका करणाऱ्या सोशल मीडियावरच्या ट्रेंड मध्ये सरसकट सगळे बॉलीवूड सेलिब्रिटी सामील झाले होते. आणि भरभरून पोस्ट टाकत होते. त्यांच्यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका हिच्यासह माधुरी दीक्षित, आलीया भट अभिनेता वरुण धवन, तृप्ती डिमरी अश्या अनेकांचा समावेश होता. साहजिकच अचानक जाग आलेल्या या विशिष्ट विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कलाकारांचे ट्रोलिंगही करण्यात आले होते. तर अनेकांनी त्यांना पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात सुरू असलेल्या अत्याचाराचा मुद्दा ,काश्मिरी पंडितांच्या निर्वासिताची मुद्दा यावर प्रतिक्रिया न देण्याबाबत सुनावले होते.
आज ऐतिहासिक कामगिरी केलेलया भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे अभिनंदन करायला मोजकेच कलाकार पुढे सरसावले आहेत. खरे तर ही संपूर्ण देशासाठी अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची अशी ऐतिहासिक घटना आहे. मात्र विशिष्ठ विचारसरणीशी सलगी साधू पाहणाऱ्या बाकी सर्व सेलिब्रिटींना ही गोष्ट तितकी महत्वाची वाटत नाही. सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर करणाऱ्या या कलाकारांसाठी आजची दिवसातली ही सर्वात मोठी घटना तितकीशी महत्वाची नाही हे समोर आले आहे.