Pm Narendra Modi: पुढील २५ वर्षांत आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे आणि त्यातील पहिली पायरी म्हणून गावांचा विकास करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. यावेळी ते अहमदाबादच्या ढोलेरा तालुक्यातील बावलियाली धाम येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या भारवाड समुदायाला डिजिटल पद्धतीने संबोधित करत होते.
ग्राम विकासासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, ‘सबका प्रयास’ ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. तसेच आगामी पिढीने शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनून सुदृढ समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले. अर्थातच समाजाचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘शिक्षणाचे महत्व’ या मुद्द्यावर त्यांनी भर दिल्याचे पाहायला मिळाले.
मोदींनी भारवाड समुदायाला ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत नैसर्गिक शेतीचा अवलंब करून वृक्षारोपण करण्याचे आवाहन देखील केले. यावेळी त्यांनी भारवाड समाजाला, प्रामुख्याने पशुपालकांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात योगदान देण्याचे आवाहन केले आहे. पुढे मोदी म्हणाले की,पूर्वी किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतकऱ्यांना दिले जात होते. आता आम्ही हा लाभ पशुपालकांनाही दिले आहे, जेणेकरून त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकेल.
विशेष म्हणजे मोदींनी भारवाड समाजाला परिस्थितीनुसार बदल घडवून आणण्याचे आणि त्यांच्या मुलींना संगणक वापरायला शिकवण्याचेही आवाहन केले. तसेच विकसित भारत घडवाण्यासाठी मला तुमच्या समुदायाची साथ हवी आहे, असे देखील मोदी भारवाड समुदायाला डिजिटल पद्धतीने संबोधित करताना म्हणाले.