Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना उत्तर प्रदेशमधील संभल न्यायालयाने नोटीस बजावली आहे.आमची लढाई भाजप(BJP)किंवा आरएसएसविरुद्ध (RSS) नाही, तर भारतीय राज्याविरुद्ध आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी केले होते. याच वादग्रस्त वक्तव्यावर संभल येथील जिल्हा न्यायाधीश न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे.
हिंदू शक्ती दलाच्या सिमरन गुप्ता यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावर संभल जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात वकील सचिन गोयल यांनी माहिती दिली आहे की, न्यायालयाने सिमरन गुप्ता यांची तक्रार स्वीकारली आहे. न्यायालयाने याचिकेवर गांभीर्य व्यक्त केले आणि राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने राहुल गांधींना ४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे किंवा उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, १५ जानेवारी रोजी राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या नवीन मुख्यालय ‘इंदिरा भवन’चे उद्घाटन केले. या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. त्यावेळी ते म्हणाले होते की, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष केवळ भाजपशीच नव्हे तर भारतीय राज्याशीही लढत आहेत.
माध्यमे काय करत आहेत हे अगदी स्पष्ट आहे. लोकांनाही माहित आहे की, माध्यमे आता स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिलेली नाहीत, असे म्हणत राहुल गांधींनी त्यावेळी माध्यमांवर भाजप दबाव आणत आहे, असाही आरोप केला होता.