Bansuri Swaraj: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुष्मा स्वराज यांच्या कन्या आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर कोर्टाने ही नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी कोर्टात होणार आहे.
हे प्रकरण मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांच्या घरावर ईडीच्या छाप्यादरम्यान बासुरी स्वराज यांनी एका टीव्ही चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्याशी संबंधित आहे. या मुलाखतीत सत्येंद्र यांच्या घरातून 3 कोटी रुपये, 1.8 किलो सोने आणि 133 सोन्याची नाणी सापडल्याचा आरोप बांसुरी स्वराज यांनी केला होता. त्यानंतर जैन यांनी बांसुरी हे आरोप खोटे असून त्यांच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारे आहेत, असे म्हटले होते.
काही महिन्यांपूर्वी ट्रायल कोर्टाने बांसुरी स्वराज यांच्याविरोधातील तक्रारीची दखल घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर जैन यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले. सत्येंद्र जैन यांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीत विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी कनिष्ठ न्यायालयाचे रेकॉर्ड मागवले होते.
दरम्यान, सत्येंद्र जैन यांना 30 मे 2022 रोजी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. त्यानंतर दीर्घकाळ तुरुंगात राहिल्यानंतर सध्या ते जामिनावर आहेत. तसेच सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या शकूरबस्ती मतदारसंघातून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला. आता पक्षाकडून त्यांची पंजाबचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.