Chandrashekhar Bawankule: वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या जमिनी काढून घेण्यासाठी केंद्रस्तरावर कायदा करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील खासगी व देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डाने बळकावल्याचे निदर्शनास येताच, त्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. २१ मार्च रोजी) विधानसभेत स्पष्ट केले.
शासकीय जमिनींवरील अतिक्रमण तसेच देवस्थान जमिनी वर्ग १ करणे आणि वनहक्क जमिनी याबाबत आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मोनिका राजळे आणि आमदार देवराव भोंगळे यांनी विधानसभेत दाखल केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना बावनकुळे यांनी म्हटले की, मंदिरांची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
महाराष्ट्र सरकारने या मुद्द्यावर गांभीर्याने विचार केला आहे. महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या शिफारशीनंतर सरकार विधिमंडळात कायदा आणणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
मराठवाड्यात काही प्रमाणात शेतकऱ्यांना जमीन परत मिळण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने चर्चा केली असली, तरी प्रत्यक्ष कायदा मंजूर करावा लागेल, असेही बावनकुळे म्हणाले. एकंदरीत बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्यातील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून जमीन मूळ मालकांना परत करण्यासाठी सरकार महत्वाच पाऊल उचलत आहे हे स्पष्टे होते.