शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) स्पष्ट करण्यात आले की भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात संघ आणि पक्षामध्ये कोणताही मतभेद नाही. हा निर्णय पूर्णपणे भाजपवर अवलंबून आहे.भाजप अध्यक्षाची निवड लवकरच होणार आहे, ज्यामुळे या संदर्भातील चर्चा आणि अफवांना पूर्णविराम मिळेल.आरएसएसचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (ABPS) बैठकीदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की “संघाच्या ३२ संबद्ध संस्था स्वतंत्रपणे काम करतात. भाजपसह प्रत्येक संस्थेची स्वतःची निर्णय प्रक्रिया आणि सदस्यता रचना आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजप आणि आरएसएस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही समाज आणि देशाच्या हितासाठी एकत्र काम करतो आणि यापुढेही करत राहू. पक्षाची निवड प्रक्रिया सुरू आहे, सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे, आणि समित्यांची स्थापना झाली आहे. लवकरच भाजप अध्यक्षाची निवड केली जाईल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले, “ही संपूर्ण प्रक्रिया भाजपच्या अंतर्गत संरचनेनुसार होईल. फक्त काही दिवस वाट पाहा, सर्व काही स्पष्ट होईल.” सध्या, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन आणि खते मंत्री देखील आहेत. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.आरएसएस ने यावेळी राष्ट्रीय एकात्मते संदर्भात देखील आपली भुमिका स्पष्ट केली. आरएसएस नेते अरुण कुमार म्हणाले, की “आपल्या राष्ट्रीय जीवनाची एक वेगळी ओळख आहे आणि प्रत्येकाने ती जपली पाहिजे. देशात अनेक भाषा आहेत, पण भावना एकसारख्याच आहेत. सर्व भाषांचा सार समान आहे.”
“भारतात विविध धर्म, खाद्यसंस्कृती आणि परंपरा आहेत, पण मूल्ये एकसारखीच आहेत. ‘एक राष्ट्र, एक जनता’ हाच आपला विश्वास आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की “ब्रिटीश काळात निर्माण झालेल्या त्रुटी दूर कराव्या लागतील. आपले संविधान ‘आम्ही भारताचे लोक’ असा संदेश देते. हाच शब्द आपली खरी ओळख आहे आणि यामुळे धर्म, भाषा, प्रांत यातील मतभेद संपतात.” ते म्हणाले की “देशाच्या भविष्यात समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. एक राष्ट्र केवळ महान नेत्यांमुळे महान बनत नाही, तर महान नागरिकांमुळे ते महान बनते. आम्ही असा समाज घडवण्यासाठी कार्यरत आहोत.”
“देशप्रेम, एकता, शिस्त, निःस्वार्थी सेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. जर समाज मजबूत झाला, तर कोणत्याही संकटाचा सामना सहज करता येईल.” असा विश्वास अरुण कुमार यांनी व्यक्त केला.“संघटनाचा विस्तार केवळ संख्यात्मक वाढीपुरता मर्यादित नाही, तर तो समाजाच्या सामर्थ्याचा जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.