२४ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील संभल शहरात हिंसाचार उसळला होता ज्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होऊन चार जणांचे बळी गेले होते. यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले. मशिदीच्या सर्वेक्षणाविरुद्धच्या निदर्शनांमुळे अशांतता निर्माण झाली, जी नंतर हिंसाचारात रूपांतरित झाली. मात्र आता या घटनेच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे, ती म्हणजे २३ मार्च रोजी शाही जामा मशिदीचे प्रमुख जफर अली यांना अटक केली आहे.
२४ नोव्हेंबरच्या हिंसक घटनांबाबत एसआयटीने जफर अली यांची चौकशी केली होती पण आता एसआयटीने त्यांना त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे ज्या दिवसापासून शहरात हिंसाचार उसळला होता.तेंव्हापासून ते आतापर्यंत संभल शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमधील हिंसाचाराशी संबंधित बारापैकी सहा प्रकरणांमध्ये एसआयटीने आधीच ४,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात १५९ जणांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे आणि हिंसाचार स्थळ आणि इतर ठिकाणांहून जप्त केलेली शस्त्रे युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स, जर्मनी आणि चेक रिपब्लिक सारख्या देशांमधून आली असल्याचे उघड झाले आहे.
होळीच्या आधी, कोणतेही नुकसान, तोडफोड किंवा रंग लागू नये म्हणून जामा मशिदीला ताडपत्रीने झाकण्यात आले होते. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मार्चचे आयोजन केले होते, तर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात आले होते.दरम्यान आता जफर अली यांच्या अटकेनंतर, शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधिकाऱ्यांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे.