स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जीवनावर आधारित ‘छावा’हा हिंदी चित्रपट बुधवारी (२६ मार्च) संसद भवन ग्रंथालय इमारतीतील बालयोगी सभागृहात दाखवला जाणार आहे.या विशेष स्क्रिनिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि खासदार देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसह चित्रपटातील सर्व कलाकार व क्रू मेंबर्स देखील या इव्हेंटला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.,
महिन्याभरापूर्वी दिल्लीत आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली होती तेंव्हा त्यांनी ‘छावा’चित्रपटाचे कौतुक केले होते. २१ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेले आहे. आजकाल, छावा देशभरात धुमाकूळ घालत आहे.संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीने या स्वरूपात करून दिला आहे.,” असे गौरवोद्गार मोदींनी काढले होते. स्वतः मोदींनी प्रशंसा केल्यानंतर या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती.दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह संसदेत ‘द साबरमती रिपोर्ट’च्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्यानंतर आता ‘छावा’ चित्रपटाला हजेरी लावणार आहेत.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर, ‘छावा’ चित्रपट प्रचंड यश मिळवत आहे. यावर्षी, रविवारी आयपीएल २०२५ च्या महत्त्वपूर्ण सामना असताना सहाव्या आठवड्यातही लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात आहेत.आतापर्यंत ‘छावा’ चित्रपटाने भारतात ५८३.३५ कोटी रुपये तर जागतिक स्तरावर ७८० कोटी रुपये कमावले आहेत.