Akhilesh Yadav: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखिलेश यादव यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अखिलेश यादव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात बोलताना म्हटले की, शिवाजी महाराजांचा तिलक त्यांच्या पायाच्या अंगठ्याने करण्यात आला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे जयकुमार रावल यांनी पलटवार केला आहे. रावल म्हणाले की, इतिहास हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. राजकारणात पराभव आणि विजय होत राहतात, पण त्याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे असा होत नाही. त्यामुळे इतिहासाशी छेडछाड करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही जयकुमार रावल यांनी केली आहे.
इतिहासाच्या चुकीच्या मांडणीमागे एक ठरवून केलेले षडयंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. अशा प्रकारची छेडछाड भाजप कधीही सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
खरेतर आजकाल कोणीही उठून थोर महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसत आहे. असे इतिहासाबद्दल बोलताना काहीतरी लक्ष्मणरेखा असायला हवी. इतिहासाचा काडीचा अभ्यास नसताना अनेकजण केवळ प्रसिद्धीसाठी सुद्धा महापुरूषांबद्दल बोलायचा स्टंट करताना दिसत आहे. आता महापुरूषांबद्दल बोलताना तारतम्य आणण्यासाठी एका विशेष कायद्याची गरज आहे की काय असा प्रश्न समोर येऊ लागला आहे.