दिशा सालियन हत्येच्या प्रकरणात तिच्या वडिलांनी आणि वकिलांनी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली. सतीश सालियन यांनी पोलीस आयुक्तांकडे एक लेखी तक्रार सादर केली आहे, ज्यात दिशा सालियन हत्येप्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तक्रार सादर केल्यानंतर सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी मीडिया समोर संवाद साधला.
वकील निलेश ओझा यांनी या प्रसंगी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेवर गंभीर आरोप केले. ओझा यांनी दावा केला आहे की, आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन हत्येच्या प्रकरणात काहीतरी थेट संबंध आहे. त्याचप्रमाणे, ओझा यांनी म्हटले की, दिनो मौर्य आणि आदित्य ठाकरे यांच्यात संभाषण झालं होतं.
निलेश ओझा यांनी सांगितले की, “जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांचा एखाद्या गुन्ह्यात सहभाग असतो, तेव्हा अशा प्रकरणात तक्रार अर्ज दिला जातो, जो एफआयआर मानला जातो. त्यामुळे आम्ही आज मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे लिखित तक्रार सादर केली आहे. त्यांनी तक्रार अर्ज स्वीकारला असून आता आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. पुढील जबाबदारी पोलिसांची आहे,आता पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावं लागेल.”