महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराबाबत काही परप्रांतियांकडून होणारी हेटाळणी वाढली आहे. एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असताना, दुसरीकडे राज्यात काही परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी मराठी बोलण्यास नकार देण्याचे प्रकार वाढले आहेत. वर्सोव्यातील डी मार्टमध्ये याचे ताजे उदा. समोर आले आहे. एका ग्राहकाने कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याची विनंती केली, त्यावर कर्मचाऱ्याने हिंदीतच बोलणार असल्याचे उद्धट उत्तर दिले. तसेच त्याने “तू काय करणार?” असा प्रश्नही विचारला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तात्काळ कारवाई केली. मनसेचे विभागीय अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी डी मार्टच्या कार्यालयात जाऊन त्या कर्मचाऱ्याला समोर उभं राहून मराठीत बोलण्याच्या संदर्भात माफी मागण्यास सांगितलं. तसेच, कर्मचाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना धडा शिकवला. मनसैनिकांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल.”
काही दिवसांपूर्वी चारकोप येथील एअरटेल गॅलरीमध्ये देखील एक महिला कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्यास नकार दिला होता. तर तिकडे पुण्यातील वाघोलीतील डी मार्टमध्येही एका कर्मचाऱ्याने “हिंदीतच बोलणार” असे म्हटल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. वारंवार घडणाऱ्याया या प्रकारांमुळे राज्यात मराठी भाषेच्या सन्मानाबाबत चर्चा वाढली आहे.
वस्तुतः संवादात अडथळा येऊ नये म्हणून आपण ज्या भागात राहतो तिथली भाषा येणे गरजेचे आहे.येत नसेल तर शिकून घेणे अपेक्षित आहे.मात्र परप्रांतातून महाराष्ट्रात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले कित्येक जण मराठी शिकणे तर दूर पण मराठी बोलण्यास सुद्धा नकार देतात त्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. वर्सोवातील ही घटना त्याचेच एक उदाहरण आहे. दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून ताबडतोब एफ आय आर नोंदवून तपास सुरु केला आहे.या घटनेनंतर आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.