प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते व्हॅल किल्मर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. व्हॅल किल्मर यांचे निधन निमोनियामुळे झाले असल्याचे समोर आले आहे. व्हॅल किल्मर यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे. किल्मर यांचे निधन मंगळवारी रात्री, 1 एप्रिल रोजी लॉस एंजेलिसमध्ये झाले. किल्मर त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
201५ मध्ये, किल्मर यांना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र, उपचारानंतर ते बरे झाले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे सुरूच ठेवले होते. अभिनेत्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची चित्रपटातील कारकीर्द देखील खूप मोठी आहे.
किल्मर यांनी 1984 साली ‘टॉप सीक्रेट’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. टॉप गन, रिअल जिनियस, टॉम्बस्टोन, बॅटमॅन, हीट आणि द सेंट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
व्हॅल किल्मर यांनी 1986 च्या मेगा बॉक्स ऑफिस हिट ‘टॉप गन’नंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटापासून त्यांच्या करिअरला गती आली. या चित्रपटात त्यांनी ‘आइसमन’ची भूमिका केली होती. ज्यामुळे ते खूप चर्चेत आले होते.
दरम्यान, हाच चित्रपट त्यांच्या आयुष्यातला शेवटचा चित्रपट ठरला. 2022 मध्ये टॉप गनचा पुढचा भाग ‘टॉप गन: मॅवेरिक’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.
दरम्यान, व्हॅल किल्मर यांना 2012 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट स्पोकन वर्ड’ ग्रॅमी नामांकन देखील मिळाले आहे.