भाजपने आपल्या विचारधारेवर ठाम राहून देशाच्या प्रगतीला दिशा दिली आहे. सत्तेवर येण्यासाठी कधीही तडजोड केली नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ३७० कलम हटवणे, राम मंदिर उभारणी आणि तीन तलाक यांसारखी आश्वासने भाजपने दिली होती, ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. भाजप जे वचन देतो, ते पूर्ण करून दाखवतो, असे प्रतिपादन नड्डा यांनी केले आहे.
भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वक्फ बोर्डाच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. नड्डा यांनी सांगितले की, भाजप सरकार वक्फच्या पैशाचा योग्य वापर करेल, हा पैसा मुस्लिमांचे शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी खर्च होईल.वक्फ बोर्डाच्या नियमांचे पालन करून ही योजना राबवली जाईल, कारण अनेक देशांमध्ये वक्फ बोर्ड सरकारद्वारे चालवले जातात.
यावेळी नड्डा यांनी भाजपच्या सदस्यसंख्येचा उल्लेख करत सांगितले की, भाजपच्या १३.५ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत, त्यामध्ये १० लाख कार्यकर्ते सक्रिय आहेत आणि ६ लाख बूथ अध्यक्ष आहेत. ७ ते १३ एप्रिलदरम्यान पक्षाचे नेते ५ लाख बूथ आणि १ लाख वस्त्यांपर्यंत पोहोचणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. भाजपचा उद्देश देशाच्या प्रगतीला चालना देणे आणि लोकशाहीला मजबूत करणे हा आहे, असा ठाम विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.