Deenanath Mangeshkar hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सावळ्या गोंधळामुळे गर्भवती तनिषा सुशांत भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रूग्णालयाच्या प्रशासनाने उपचार सुरू करण्यापूर्वी पैशांची मागणी केली, त्यानंतर आहे तेवढ पैसे लगेच भरायला आणि उर्वरीत पैसै लवकरच भरायची तयारी दाखवली असतानाही रूग्णालयाने उपचार न केल्याने पैशांअभावी तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला होता. यामध्ये डॉ. घैसास यांचे नाव भिसे कुटुंबाने घेतले होते.
भिसे कुटुंबाने आरोप केला होता की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी उपचारांआधी १० लाख रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यास सांगितली. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर टीका होत आहे. या प्रकरणी डॉ. घैसास चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता याच डॉ. सुश्रुत घैसास यांनी रूग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ.धनंजय केळकर यांच्याकडे सोपावला आहे. या प्रकरणी होणारी त्यांची चौकशी आणि टीकेला कंटाळून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचे माहिती समोरी आली आहे.
डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आमदार अमित गोरखे यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे. “भिसे कुटुंबाचं सुरुवातीपासून म्हणणे होते की या दुर्दैवी मृत्यूला डॉ. घैसास जबाबदार आहेत. आता घैसास यांनी राजीनामा दिला आहे. याचाच अर्थ तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कुठेतरी घैसास यांना अपराधीपणा वाटत होता. त्याच अपराथी भावेतून त्यानी राजीनामा दिला असावा, आपण कुठेतरी चुकलोय ही भावना त्यांच्या मनात आली असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा,” असे गोरखे म्हणाले.
दरम्यान, या घटनेवरती राज्य शासनाने डॉ. राधाकृष्ण पवार यांचा अध्यक्षतेखाली रूग्णालयाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. नुकताच या समितीचा अहवाल समोर आला आहे. या समितीने रूग्णालयाला दोषी ठरवले आहे. साडेपाच तास भिसे मंगेशकर रुग्णालयात होत्या. त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या. त्यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार आहे, असा अहवाल या समितीने दिला आहे.