२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला काल (गुरुवार) अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. पण जेंव्हापासून त्याला ताब्यात घेतले आहे. तेंव्हापासून अनेक नवनवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत. त्यातच तो आता मुंबई हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीच्या संपर्कात होता अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून राणाची कसून तपासणी करण्यात येणार आहे.
राणा हा मूळचा पाकिस्तानचा असून तो सध्या कॅनडाचा नागरिक आहे. सध्या त्याचे वय ६४ वर्षं आहे. भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. पण अखेर त्याला ताब्यात घेण्यात भारताला यश आले आहे. राणाची चौकशी अनेक एजन्स्या मिळून करणार आहेत. यात गुप्तचर संस्था, एनआयएचे अधिकारी, आणि मानसशास्त्रज्ञ सहभागी असतील. या चौकशीत राणाचे पाकिस्तानच्या आयएसआय (ISI), लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध आणि भारतातील संपर्क यांचा तपास केला जाईल.
गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार राणाने मुंबई हल्ल्याचा दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीशी भारत दौऱ्यांदरम्यान तब्बल २३१ वेळा संपर्क केला होता. राणाला अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पकडण्यात आलं होतं. तिथे भारतीय अधिकाऱ्यांनी त्याचं प्रत्यार्पण करून त्याला भारतात आणलं. अमेरिकेतील तुरुंगातून त्याचं नावही आता काढून टाकण्यात आले आहे.
आता पुढे काय?
राणाला सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. त्याच्यावर भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, खून, कट रचणे आणि दहशतवादी कारवायांचे आरोप आहेत. जर पुढील टप्प्यात त्याला मुंबईत हलवण्यात आलं, तर त्याला अजमल कसाबला ज्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं, त्याच उच्च-सुरक्षा कक्षात ठेवण्याची शक्यता आहे.
वास्तविक देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून दहशतवादी कारवायांना काही अंशी लगाम लागला असल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्याचा भारत हा पाकिस्तानला देखील जशास तसे उत्तर द्यायाला मागे पुढे पाहत नाही हे गेल्या काही वर्षात पहायला मिळाले. ही सर्व ताकत आहे भारतीय सैन्याची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची. राणाच्या बाबतीत तो भारतात येण्यापुर्वीच शाह यांनी राणा भारतात परत येईल आणि येथील न्यायालयात हजर राहील. तसेच त्याला संविधानानुसार शिक्षाही होईल,अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे आता राणाला अमेरिकेतून भारतात आणणे हे मोदी सरकारच्या राजनैतिकतेचे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे.