मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “राणाच्या चौकशीत राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.”
फडणवीस म्हणाले, “तहव्वुर राणाला भारतात आणण्यात सरकारला यश मिळाले आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. कसाबला फाशी देण्यात आली होती, मात्र या कटामागचा दुसरा मुख्य सूत्रधार अजूनही बाहेर होता. त्याचं भारतात आगमन हे न्यायप्रक्रियेसाठी महत्त्वाचं पाऊल आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारत सरकारने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या हल्ल्यात ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले, अशा सर्व मुंबईकरांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेषतः आभार मानतो
सध्या या प्रकरणाचा तपास एनआयएकडे असून, फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, ‘आम्हाला जी काही माहिती हवी असेल ती आम्ही एनआयएकडून घेऊ आणि जर त्यांना काही मदत हवी असेल तर आम्ही ती मुंबई पोलिसांमार्फत करू,’ असेही मुख्यमंत्री तथा राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक महत्त्वाच्या इमारती आणि गर्दीची ठिकाणे लक्ष्य करण्यात आली होती. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला आणि २३८ हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर पीडितांना न्याय मिळावा म्हणून अनेक प्रयत्न सुरू झाले. १६ मे २०२३ रोजी कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने तहव्वूर राणाच्या भारतात पाठवण्याला (प्रत्यार्पणाला) मंजुरी दिली. पण राणाने या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा सुरू ठेवला त्याने नवव्या सर्किट कोर्टात आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. मात्र, त्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या. शेवटी तहव्वूर राणाला ताब्यात घेण्यात आले.