Udayanraje Bhosale: काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. “वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी” अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती.
या सगळ्यावरती नुकतीच उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराजांबद्दल प्रेम असताना ब्रिटिशांनी पैसे दिले होते. ते महाराजांच्या समाधीसाठी पैसे दिले होते. ते कुत्र कुठून आले होते. त्यांनी हे केले. कुठला वाघ्या अन् काय, कुत्र आले कुठून? ते कुत्र पाहा, एवढ्या लांब कानाचे कुत्र कधी भारतात पाहिले का? ही सगळी ब्रिटिशांची कुत्री होती. काढून टाका, फेकून टाका, कुठे एवढे कौतुक असायला पाहिजे. उद्या काय, द्यायचा दणका आणि कापून टाकायचे. एवढे काय किती विचार करायचा”,अशा शब्दांत उदयनराजेंनी वाघ्या कुत्रा हटवण्याची पुन्हा एकदा मागणी केली.
दरम्यान, पुढे उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईमध्ये समुद्रामध्ये होणाऱ्या स्मारकाबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे. अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक व्हावे तिथे शक्य नसेल तर गव्हर्नर हाऊसच्या जागेत व्हावे. गव्हर्नर यांना राहण्यासाठी जागा लागतेच किती? 48 एकर जमीन आहे. त्या जागेत व्हायला हवे, याबद्दल मी अमित शहा यांच्याशी बोलणार आहे,” असेही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.