पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याच्या विरोधात निघालेले आंदोलन अचानक हिंसक झाले सुती आणि शमशेरगंज भागात मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली. आंदोलनादरम्यान 10 पोलीस जखमी झाले आहेत.
शुक्रवारी जुम्याची नमाज झाल्यानंतर काही लोकांनी एकत्र येऊन वक्फ कायद्याविरोधात निदर्शने सुरू केली. मात्र, पाहता पाहता जमाव आक्रमक झाला आणि रस्त्यावर दगडफेक सुरू झाली. काही आंदोलनकर्त्यांनी पोलीस वाहने आणि इतर सार्वजनिक वाहने पेटवली. तसेच शमशेरगंज परिसरात आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग 12 बंद केला. मालदा येथे रेल्वे रुळांवर बसून आंदोलन करण्यात आले , ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही पोलीस जखमी झाल्यामुळे त्यांना जवळच्या मशिदीत लपावं लागलं.
राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी राज्य सरकारला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, हिंसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे आणि अफवा पसरवणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच परिस्थिती आता नियंत्रणात आहे असेही सांगण्यात येत आहे.
एकीकडे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे ‘सूफी संवाद महा अभियान’चे राष्ट्रीय सह-प्रभारी आबिद अली यासीन चौधरी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांसारख्या अनेक मुस्लीम नेत्यांनी या वक्फ कायद्याला पाठींबा दिला असताना आणि या कायद्याचे मुस्लिम समुदायाला होणारे फायदेही त्यांनी सांगितले असताना हा विरोध नेमका कशासाठी? असा सवाल उपस्थितीत होत आहे. खरतर संसदेच्या दोन्ही सभागृहाने या विधेयकाला मंजुरी दिली असून राष्ट्रपतीनीही त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. पण असे असतानाही पश्चिम बंगालमध्ये याविरोधात आंदोलने काढण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यंमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की पश्चिम बंगालमध्ये हे विधेयक कोणत्याही परीस्थित लागू होऊ देणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ३३ टक्के अल्पसंख्याक आहेत. मी त्यांचं काय करू? इतिहासात लिहिलंय की पश्चिम बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हे सगळे एकत्रच होते. फाळणी नंतर झाली. पण आता जे इथे राहात आहेत, त्यांना संरक्षण देणं हे आपले काम आहे. तुम्ही लक्षात ठेवा की मी इथे आहे तोपर्यंत मी तुमचं आणि तुमच्या मालमत्तेच रक्षण करेन. आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा असेही त्या म्हणल्या होत्या.
सरकारी आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशच्या खालोखाल ‘वक्फ’ मालमत्ता या प. बंगालमध्येच आहेत. एकूण 80 हजार, 480 ‘वक्फ’च्या मालमत्ता एकट्या प. बंगालमध्ये असून, त्यांनी 82 हजार, 11 एकर इतकी राज्यातील जमीन व्यापलेली. यावरून तेथील ‘वक्फ बोर्डा’च्या जमिनी बळकावण्याच्या वेगाचा अंदाज येतो.मात्र मतांच्या लाचारीमुळे दीदींना राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, घुसखोरी यांच्याशी काहीएक देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशी भूमिका घेण्यामागे त्यांचा राजकीय हेतू असल्याची टीका देखील आता त्यांच्यावर होऊ लागली आहे.