Maharashtra Railway Station: राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १३२ रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. अर्थातच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विस्तृत योजना आखली आहे.
या योजनेत महाराष्ट्रातील लहान-मोठ्या अशा १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून या स्थानकांचे आधुनिकीकरण टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या स्थानकांवर काम सुरू केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पहिल्या टप्प्यात कोणत्या स्थानकांचा विकास केला जाईल, याची घोषणा अद्याप झाली नसून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
या योजनेमुळे राज्यातील अनेक जुन्या आणि गैरसोयीच्या रेल्वे स्थानकांना नवसंजीवनी मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगला आणि सुखद अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, अशी देखील आशा व्यक्त केली जात आहे.
‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत प्रवाशांना कोणत्या आधुनिक सोयीसुविधा मिळतील ?
– प्रवाशांसाठी आरामदायक आणि प्रशस्त प्रतीक्षालयांची निर्मिती केली जाणार आहे, ज्यात वातानुकूलित जागा आणि बसण्याची चांगली व्यवस्था असेल.
– रेल्वेस्थानकावर स्वच्छ आणि आधुनिक स्वच्छतागृहे बांधली जातील, तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली जाईल.
– दिव्यांग प्रवाशांना सहजपणे ये-जा करता यावी यासाठी रॅम्प, लिफ्ट आणि विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाणार आहे.
-प्रवाशांना मार्गदर्शन प्रणाली स्थानकांवर डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि उद्घोषणा प्रणालीद्वारे गाड्यांच्या वेळापत्रकाची आणि प्लॅटफॉर्मची अचूक माहिती दिली जाईल.
– स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी सुरक्षा कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षित वाटेल.
-प्रवाशांच्या सोयीसाठी विविध खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तूंची दुकाने स्थानकांवर उपलब्ध केली जातील.
– स्थानकांवर ऊर्जा-बचत करणारी आधुनिक प्रकाश योजना स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळीही स्थानके व्यवस्थित प्रकाशित राहतील.
-रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते, पार्किंग व्यवस्था आणि इतर सार्वजनिक सुविधांचा देखील विकास केला जाणार आहे.