अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या ठाम आणि आक्रमक निर्णयांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेषतः आयातशुल्क (टॅरिफ) धोरणांमुळे जागतिक बाजारपेठेत उलथापालथ झाली आहे. या निर्णयांचे परिणाम काही ठिकाणी फायदेशीर तर काही ठिकाणी तोट्याचे ठरले आहेत. भारताच्या दृष्टीने पाहिल्यास, विविध तज्ञांनी अमेरिकन टॅरिफच्या प्रभावाबाबत वेगवेगळ्या मते मांडली आहेत. मात्र, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत पाश्चात्य देशांच्या कंपन्यांसाठी एक मोठी आणि आकर्षक बाजारपेठ म्हणून पुढे येण्याची तयारी करत आहे. त्यामुळे भारतालाही याचा फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर पाश्चात्य कंपन्यांनाही नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
भारत – नवीन आणि मोठी बाजारपेठ
अमेरिका आणि चीन व्यापारयुद्धात गुंतलेले असताना पाश्चात्य देश (जसे की युरोपियन देश, अमेरिका, इ.) भारताकडे मोठ्या बाजारपेठेच्या रूपात पाहत आहेत. भारतात जगातील अनेक कंपन्या आपली उत्पादने (उदा. अमेरिकन व्हिस्की, हार्ले-डेव्हिडसन बाइक, ब्रिटिश लक्झरी कार्स) विकण्यास उत्सुक आहेत. कारण भारतात अशी उत्पादने खरेदी करण्याची ताकद असलेल्या लोकांची संख्या वाढते आहे.
भारत लवकरच मोठा ग्राहक देश होणार
एक अहवाल सांगतो की, 2026 पर्यंत भारत जर्मनी आणि जपान यांसारख्या मोठ्या देशांना मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक बाजार बनणार आहे. फक्त अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे असतील.म्हणजे, या दोन देशांनंतर भारत तिसरा सर्वात मोठा बाजार बनेल असा अहवालात दावा करण्यात आला आहे.
भारतात श्रीमंतांची संख्या वाढते आहे
2023 मध्ये भारतात 4 कोटी लोक असे होते ज्यांचं वार्षिक उत्पन्न 10,000 डॉलर (सुमारे 8.6 लाख रुपये) पेक्षा जास्त होतं. पुढील 5 वर्षांत ही संख्या दुप्पट होऊन 8.8 कोटीपर्यंत जाणार आहे. याचा अर्थ – महागड्या वस्तू खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप वाढत आहे.
विदेशी कंपन्यांना भारत वाटतोय आकर्षक
पाश्चात्य देशांमध्ये लोकांचं वय वाढत चाललं आहे आणि खर्च कमी होतो आहे. उलट भारतात तरुण लोकसंख्या अधिक आहे आणि श्रीमंतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे भारत हे एक उत्तम आणि मोठं मार्केट बनतं आहे. यासाठी पाश्चात्य कंपन्या भारतात येण्यास आणि कमी टॅरिफ मागण्यास तयार आहेत, जेणेकरून त्यांना स्पर्धा करता येईल.
एकीकडे मोठे देश व्यापारात अडचणींचा सामना करत असताना दुसरीकडे भारतासाठी मात्र ही खूप मोठी संधी आहे. परदेशी कंपन्या भारतात येऊ पाहत आहेत आणि भारत ही त्यांच्यासाठी सर्वात आवडती बाजारपेठ बनत चालली असल्याचे दिसून येत आहे. जी भारतासाठी हिताची ठरत आहे.