केंद्र आणी काही राज्यातील सरकारे ड्रग्स तस्करी विरोधात विविध प्रकारच्या मोहीम राबवत असताना तिकडे गुजरातमध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा मोठा साठा आढळून आला आहे. गुजरातच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातून ३०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. या ड्रग्जची किंमत १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय हे जप्त केलेले अमली पदार्थ मेथाम्फेटामाईन असल्याचा संशय आहे. ही कारवाई गुजरात १२-१३ एप्रिल २०२५ च्या रात्री ATS (Ant-Terrorism Squad) आणि भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) एकत्रितपणे केली आहे.
https://twitter.com/dgpgujarat/status/1911623916067381293
तस्कर पळून गेले, पण ड्रग्ज जप्त
जेव्हा तटरक्षक दलाचं जहाज तस्करांना दिसलं, तेव्हा त्यांनी घाबरून ड्रग्ज समुद्रात फेकले आणि पाकिस्तानजवळील समुद्री हद्द (IMBL) ओलांडून पळून गेले. तरीही तटरक्षक दलाने समुद्रातून सगळा माल गोळा करून तो गुजरात ATS कडे दिला आहे.
सरकारी यंत्रणांची यशस्वी कारवाई
इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडल्याने हे स्पष्ट होतं की, सरकारी यंत्रणा एकत्रितपणे उत्तम आणि सतर्क राहून काम करत आहे. लवकरच गुजरात ATS यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती देणार आहे.
याआधीही करण्यात आली होती मोठी कारवाई
आता ही पहिलीच कारवाई आहे असे नाही.याआधीही अशाच प्रकारे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडण्यात आले होते. यादरम्यान तस्करी रोखण्यासाठी मागील वर्षी २०२४ मध्ये ऑपरेशन सागर मंथन सुरू करण्यात आले होते. या मोहिमेत एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो)च्या ऑपरेशन ब्रांचचे अधिकारी, भारतीय नौदलाची गुप्तचर यंत्रणा, इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात ATS हे सर्व एकत्र काम करत होते. मागच्या वर्षी केलेल्या या ऑपरेशनमध्ये एकूण ३४०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. याशिवाय ११ इराणी आणि १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली होती.
ऑपरेशन सागर मंथन ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली होती. या अंतर्गत विविध तपास संस्था एकत्र येऊन समुद्रामार्गे येणाऱ्या ड्रग्सच्या तस्करीला आळा घालण्यासाठी संयुक्तपणे कारवाई करत आहेत.
भारताची तरुण पिढी आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी देशाच्या शत्रूंकडून सतत अनेक प्रकारचे कट रचले जात आहेत.हा देखील त्याचाच एक भाग असल्याचे दिसून येत आहे.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तचर यंत्रणा शत्रूंचे हे कुटील डाव कसे उधळून लावते याचा पुन्हा एकदा या निमित्ताने प्रत्यय आला.