Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच १४ एप्रिल रोजी हरियाणातील हिसार येथील एका जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेसला मुस्लिमांबद्दल खरोखरच सहानुभूती असेल, तर त्यांनी मुस्लिम व्यक्तीला पक्षाध्यक्ष बनवून दाखवावे, असे खुले आव्हान दिले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काँग्रेस नेहमीच मुस्लिमांच्या हिताच्या गप्पा मारते. जर त्यांना खरोखरच मुस्लिमांबद्दल सहानुभूती असेल, तर त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला पक्षाध्यक्ष बनवावे. तसेच, आगामी निवडणुकांमध्ये मुस्लिमांना ५० टक्के तिकीट देऊन दाखवावे. परंतु काँग्रेसला असे करायचे नाही, त्यांना फक्त समाजात फूट पाडायची आहे.”
मोदींनी काँग्रेसवर वक्फ कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोपही केला. मोदी म्हणाले की, “काँग्रेसने वक्फ कायद्यात मनमानी बदल केले, ज्यामुळे गरीब मुस्लिमांचे नुकसान झाले. वक्फच्या मालमत्तेचा वापर भूमाफियांनी केला, ज्यामुळे दलित, मागासवर्गीय आणि विधवांच्या जमिनी लुटल्या गेल्या.” तसेच आम्ही वक्फ कायद्यात सुधारणा केल्यामुळे आता गरीब मुस्लिमांना त्यांचे हक्क मिळतील, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि दलितांना केवळ व्होट बँक म्हणून वापरले. काँग्रेसने देशात व्होट बँकेचे राजकारण पसरवले. काँग्रेसने कधीही मुस्लिमांचे भले करण्याचा विचार केला नाही. त्यांनी फक्त काही कट्टरपंथीयांना खूश केले आणि उर्वरित समाज दयनीय अवस्थेत ठेवला, अशी टोलाही मोदींनी यावेळी काॅंग्रेसला लगावला आहे. मोदींनी काॅंग्रेसबद्दल केलेल्या या भाष्यानंतर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.