देशातील बेकायदेशीर घुसखोरी थांबवण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुकतच दिल्लीतून १५ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. हे लोक व्हिसा संपल्यानंतरही भारतात राहात होते, तसेच त्यांच्याजवळ वैध व्हिसाच नव्हता. पोलिसांनी मोहन गार्डन आणि उत्तम नगर भागांमध्ये ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये १२ नायजेरियन, १ आयव्हरी कोस्टचा नागरिक आणि काही बांगलादेशी घुसखोर आहेत.
हे सर्व परदेशी नागरिक नियम मोडून भारतात जास्त काळ राहात होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडून डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले. आता त्यांच्यावरची तपासणी झाल्यानंतर FRRO (Foreigners Regional Registration Office) ने त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
याआधीही दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. विशेषतः बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरोधात अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर एक बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गृह मंत्री आशिष सूद आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे घुसखोर देशासाठी धोका ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या घुसखोरांना बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्लीत राहण्यास मदत करणारे काही नेटवर्कही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही नजर ठेवली जात आहे आणि त्या नेटवर्कवरही छापे घालून पोलिसांनी अॅक्शन सुरू केली आहे. एकूणच घुसखोरांविरोधात सुरु असलेली ही मोहीम खुपच जोरकसपणे सुरु असल्याचे दिसून येत आहे.