जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी फक्त हिंदूंना लक्ष करत हिंदू राष्ट्रात अशांतता पसरवण्याचे काम केले. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही देशांमधले तणाव आणखी वाढले व अनेक हितसंबंधित करार रद्द करण्यात आले. याचदरम्यान, आता केंद्र सरकराने देशात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता भारत सरकारने मॉक ड्रिलचे आदेश दिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेमकं मॉक ड्रिल काय आहे? मॉक ड्रिल का लागू केला जातो ? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. आजच्या या लेखात आपण याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत.
https://x.com/shravanpriti/status/1919464686875029542
MHA has asked several states to conduct mock drills in for items for effective civil defence on 7th May: Government of India Sources
Following measures will be undertaken –
1.Operationalization of Air Raid Warning Sirens
2. Training of civilians, students, etc, on the civil…— ANI (@ANI) May 5, 2025
मॉक ड्रिल म्हणजे काय?
मॉक ड्रिल हा पूर्व नियोजित अभ्यास असतो. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचे नाट्य रुपांतर केले जाते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतील हे मॉक ड्रिल आयोजित करून पाहिले जाते. मॉक ड्रिल दरम्यान कुठेतरी आग लागली, दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाल्याचे वातावरण निर्माण केले जाते आणि लोकांना अशा परिस्थितीतून सुरक्षित कसे बाहेर काढले जात आहे याची पूर्ण पहिली जाते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पत्रानुसार, 7 मे रोजी होणारा मॉक ड्रिल शहर ते ग्रामीण भागांपर्यंत आयोजित केला जाईल.
भारतात यापूर्वी मॉक ड्रिल कधी झाले होते?
भारतात यापूर्वी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले होते. 1971 मध्ये, भारत-पाक युद्ध आणि बांगलादेश मुक्ती युद्धाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले होते. या मॉक ड्रीलचा उद्देश नागरिकांना हवाई हल्ल्यांपासून आणि युद्धजन्य परिस्थितीपासून सुरक्षित ठेवणे हा होता.
मॉक ड्रिल का आवश्यक आहे?
सध्याच्या स्थितीत अचानक कोणतीही आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास देशातील नागरिकांनी, तसेच सुरक्षा यंत्रणेने आधीच तयार असणे आवश्यक आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून याचीच पडताळणी केली जाते. धोक्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य कसे वागतात ? सुरक्षा कर्मचारी आणि बचाव टीम किती तत्परतेने प्रतिक्रिया देतात? सुरक्षा उपकरण आणि अलर्ट प्रणाली योग्य पद्धतीने काम करीत आहेत की नाही ? कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणेची गरज आहे ? या गोष्टी मॉक ड्रिल सरावादरम्यान पहिल्या जातात. आणि जर यात काही त्रुटी आढळली तर त्यात सुधारणा करण्यात येतात. एक प्रकारे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी केलेली पूर्वतयारी म्हणजे मॉक ड्रिल.
मॉक ड्रिलची प्रक्रिया कशी असते?
ठरलेल्या वेळेनुसार, ठरलेल्या ठिकाणी अलार्म वाजवला जातो किंवा इशारा दिला जातो. लोकांना परिस्थितीविषयी सांगितले जाते. (उदा. बॉम्बस्फोटाची किंवा भूकंपाची सूचना दिली जाते). त्यानंतर फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचतात. लोकांना सुरक्षित बाहेर काढतात. सर्व प्रक्रियेचे मूल्यांकन केले जाते. या सर्व गोष्टीला किती वेळ लागला? काय कमतरता होती ? काय सुरधारण करायची गरज आहे ? हे पाहिले जाते.
आता 7 मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिल विषयी जाणून घेऊया…
या मॉक ड्रिलमध्ये कोणती पावले उचलली जातील?
हवाई हल्ल्याचा इशारा
हवाई हल्ल्याचा इशारा देण्यासाठी सायरन वाजवले जातील.
नागरिकांचे प्रशिक्षण
नागरिक आणि विद्यार्थ्यांना शत्रूच्या हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल.
ब्लॅकआउट
शहरांमध्ये दिवे बंद करण्याची व्यवस्था केली जाईल.
स्थलांतर
आवश्यक असल्यास नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले जाईल.
महत्त्वाचे स्थान संरक्षण
महत्त्वाच्या स्थळांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
सायरन कुठे बसवले जातील?
सरकारी इमारत, प्रशासकीय इमारत, पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, लष्करी तळ, शहरातील मोठ्या बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणी.
महाराष्ट्रात किती ठिकाणी होणार मॉक ड्रिल?
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील 244 सूचीबद्ध जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाचा सराव आणि मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. यात मुंबई, उरण, तारापूर ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
मॉक ड्रिलची सुरुवात जगात कधी पासून झाली?
मॉक ड्रिलची सुरुवात जगात १९६० च्या दशकात झाली. अमेरिकेने १९६२ मध्ये अणुहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित केले होते, जिथे लोकांना टेबलाखाली डोके लपवून संरक्षण कसे करायचे याचा सराव करून दिला होता. तर भारतात १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर मॉक ड्रिलची सुरुवात झाली.
युद्धाची चाहूल
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध अनेक मोठी पाऊले उचलली आहेत. सिंधू पाणी कराराला स्थिगिती, दोन्ही देशातील व्यापार कराराला स्थिगिती, डिजिटल स्ट्राईक, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिजा रद्द करणे, असे अनेक निर्णय भारत सरकरानेपहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरुद्ध घेतले आहेत. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैनिकांना फ्री हॅन्ड देखील देण्याची घोषणा केली आणि आता केंद्र सरकारने मॉक ड्रिलची घोषणा करत आगामी काळात युद्धाची स्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत.