२०१९ मध्ये अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाला जम्मू आणि काश्मीरपेक्षाही मोठा धोका मानत भारतातून कायमचा नाक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी योग्य ती पाऊले देखील उचलली. अमित शाह यांनी २०२६ पर्यंत भारतातील नक्षलवाद मुळापासून संपवणार असल्याची शपथ घेत, मोठी पाऊले उचलली व त्या दिशेने कारवाई देखील सुरु केली. जेव्हापासून अमित शाह यांनी नक्षलवाद संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे तेव्हापासून केंद्र सरकाराला यामध्ये मोठे यश आले.
याचदरम्यान महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधात सुरु असलेल्या कारवाईत पंधरा वर्षांपासून फरार असलेल्या माओवाद्याला पकडण्यात मोठे यश आले आहे. हा माओवादी पुण्यातील असून, 2010 मध्ये कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. प्रशांत कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ असे या माओवाद्याचे नाव आहे. पोलिसांनी कशी केली कारवाई ? पाहूया…
संगणक आणि लॅपटॉप रिपेअरिंग करणारा प्रशांत कांबळे पुण्यातील ताडीवाला रोड वस्तीमध्ये राहत होता. प्रशांत गेल्या 15 वर्षांपासून बेपत्ता होता. प्रशांत नोव्हेंबर 2010 मध्ये घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी जानेवारी 2011 मध्ये पोलीस स्थानकात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, पोलीस जेव्हा त्याचा तपास करत होते तेव्हा पोलिसांना प्रशांत, कबीर कला मंचाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. याच कालावधीत एटीएसच्या पथकाने संशयित माओवादी अँजेलो सोनटक्केला ठाणे येथून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ही कारवाई 2011 मध्ये केली होती. अँजेलोचे पुण्यातील काही सक्रिय सहकारी आणि कबीर कलामंचाच्या काही कलाकारांना नक्षलवादाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. या सर्वांवर माओवादीचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवत UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एटीएसच्या तपासामध्ये बेपत्ता झालेला प्रशांत कांबळे देखील या माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले होते. अशातच पोलिसांनी फरार आरोपी म्हणून प्रशांतवर गुन्हा दाखल केला होता. पुढे पोलिसांना प्रशांत, माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह काम करत असल्याचे देखील समोर आले होते. यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये तेलतुंबडे गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तर आता प्रशांत कांबळेला एटीएसकडून अटक करण्यात यश आले असून, त्याला ठाणे युनिटच्या ताब्यात दिले आहे. प्रशांतला आता काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत कंप्युटर दुरुस्तीच्या कामात तरबेज असल्याने प्रशांतला ‘लॅपटॉप’ असे नाव देण्यात आले होते.
प्रशांत कांबळे याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा नक्षलवाद मुद्दा चर्चेत आला. याच पार्श्वभूमीवर नक्षलवाद म्हणजे काय आहे? भारतात कधी पासून नक्षलवाद चळवळ सुरु झाली याबद्दल जाणून घेऊया…
माओवाद अर्थात नक्षलवादाची सुरुवात भारतात 1960 च्या दशकात पश्चिम बंगालपासून सुरु झाली होती. पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात चारू मुजूमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे नक्षलवाद असे संबोधले जाऊ लागले. 70 च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केले. आणि ही चळवळ आज भारतभर पसरली आहे.
ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्नही झाला मात्र, गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले. आणि पोलिसांना देखील यात यश आले नाही. आणि म्हणून भारत सरकराने नक्षलवाद संपवण्यासाठी एक मोहीम हाती घेतली, ज्याअंतर्गत सरकारला मोठ्या प्रमाणात यश आल्याचे देखील दिसून येत आहे.
गडचिरोली, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ, आणि आंध्र प्रदेश या भागात नाक्षवादाचा मोठा प्रभाव आहे. या भागात गेल्या काही काळापासून नक्षलवाद संपवण्यासाठी मोठी कारवाई देखील सुरु आहे. तसेच नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारकडून या नाक्षवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येत आहे. सरकारच्या या मोहीमे अंतर्गत आतापर्यंत अनेक नक्षलवादी शरण देखील आले आहेत आणि नव्याने आपले जीवन जगत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर येथील सक्रिय माओवादी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करत आहेत. फडणवीसांनी २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील नक्षलवाद संपावर असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. जानेवारी २०२५ च्या सुरुवातीलाच गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एकूण ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आल्यानंतर काम देखील देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर अनेक नक्षलवादी आपले हत्यार टाकून आत्मसमर्पण करताना दिसत आहेत.