मुंबई | मे २०२५ : १९९३ च्या मुंबईला हादरवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील एक प्रमुख आरोपी, आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास विश्वासू फारुख टकला, अखेर न्यायालयाच्या जाळ्यात अडकला आहे. पासपोर्ट फसवणुकीच्या गुन्ह्यात दोषी ठरवून त्याला नुकतीच ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण त्याचा हा केवळ एक गुन्हा नाही, ही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्याने भारताच्या हृदयावर घाव घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कटामध्ये सक्रिय भूमिका बजावली होती.
१२ मार्च १९९३ भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत एकाएकी झालेल्या १३ साखळी बॉम्बस्फोटांनी अवघा देश हादरला. या भयानक हल्ल्यात २५० हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या अघोरी कटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी कंपनी’तील काही विश्वासू गुन्हेगारी सहकाऱ्यांपैकी एक, फारुख टकला, यांचा सहभाग होता, पण फारुख टकला नेमका कोण आहे? त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा साखळी बॉम्बस्फोट का घडवून आणला होता? सध्या या बॉम्बस्फोटातील आरोपी कुठे आहेत? या आणि या संदर्भातील इतरही अनेक गोष्टींचा मागोवा आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
कोण आहे फारुख टकला?
फारुख टकलाचे पूर्ण नाव यासिर मन्सूर मोहम्मद फारुख असे असून, अंडरवर्ल्डमध्ये तो फारुख टकला या टोपणनावाने ओळखला जात होता. तो दाऊद इब्राहिमच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याचा महत्त्वाचा भाग होता. विशेषतः ‘डी कंपनी’च्या दुबईतील व्यवहारांवर आणि आर्थिक घडामोडींवर त्याचे नियंत्रण होते. दुबईमधून तो भारतविरोधी कारवायांचे व्यवस्थापन करत होता, त्यात हवाला व्यवहार, शस्त्र तस्करी आणि दहशतवाद्यांना आश्रय देणे यांचा समावेश होता.
१९९३ च्या बॉम्बस्फोटामागील कारण काय?
या साखळी बॉम्बस्फोटांचे मूळ १९९२ च्या बाबरी मशीद पाडल्यानंतर निर्माण झालेल्या सांप्रदायिक तणावात आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ आणि त्यानंतर मुंबईत झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत हिंदू आणि अनेक मुस्लिमांचा मृत्यू झाला. याच निषेधात, दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’ने हे स्फोट घडवून आणले असावेत असा तपास यंत्रणांचा निष्कर्ष आहे.पण यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेकांना आपल्या जवळच्या किंवा कुटुंबातील सदस्यांपासून पारखे व्हावे लागले.
फारुख टकलाची भूमिका
तपास यंत्रणांच्या मते, फारुख टकला याने या स्फोटांच्या तयारीसाठी विदेशी मदत व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले. पाकिस्तानमधील ISI (Inter-Services Intelligence) या गुप्तचर संस्थेशी ‘डी कंपनी’च्या माध्यमातून त्याचा संपर्क होता. दुबईत बसून फारुखने संपूर्ण कटाची आर्थिक रचना आखली. बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रशिक्षित अतिरेक्यांना भारतात पाठवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याची ही भूमिका इतकी गंभीर होती की, १९९५ मध्ये त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याआधी, एप्रिल महिन्यात मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने, १९९३ स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबियांच्या १४ मालमत्ता केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते. या मालमत्तांमध्ये फ्लॅट्स, प्लॉट्स, ऑफिस आणि दुकाने समाविष्ट आहेत.
अटक आणि भारतात प्रत्यार्पण
सुमारे दोन दशके फरार राहिल्यानंतर,६६ वर्षीय फारूक यासीन मन्सूर ऊर्फ फारूक टकला याला २०१८ मध्ये दुबईतून भारतात परत आणण्यात आले. त्याच दिवशी मुंबई विमानतळावर पोहोचताच, CBI आणि मुंबई पोलीस यांनी त्याला अटक केली. त्याच्यावर TADA (Terrorist and Disruptive Activities Act) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला असून, त्याची न्यायालयीन सुनावणी सुरू आहे.
या हल्ल्यामागे कोण होता सूत्रधार?
या संपूर्ण बॉम्बस्फोटांच्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम होता. त्याने आपली गुन्हेगारी साम्राज्य केवळ मुंबईत मर्यादित न ठेवता, आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारले. त्याच्या योजनांमध्ये फारुख टकला, टायगर मेमन, अनीस इब्राहिम यांसारखे अनेक जण सामील होते. हे सगळे मिळून त्यांनी मुंबईवर एक नियोजित आणि धक्कादायक हल्ला केला, ज्याने भारताच्या सुरक्षेच्या पायाभूत गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
दोषी ठरलेले आणि तुरुंगात असलेले आरोपी
अबू सालेम (Abu Salem): 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणलेला. त्याला जीवनभर कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे.
ताहेर मोहम्मद मर्चंट (Taher Mohammad Merchant) आणि फिरोज अब्दुल राशिद खान (Firoz Abdul Rashid Khan): दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती.
करिमुल्ला ओस्मान खान (Karimullah Osan Khan): त्यालाही जीवनभर कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे.
रियाझ अहमद सिद्धिकी (Riyaz Ahmed Siddiqui): त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे.
मुनाफ अब्दुल मजीद (Munaf Abdul Majid): त्याला 2024 मध्ये कोल्हापूरच्या कालंबा मध्यवर्ती तुरुंगात इतर कैद्यांनी मारहाण करून ठार केले. या व्यतिरिक्त या प्रकरणात अजूनही बरेच आरोपी सहभागी असल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांवर टीका
१९९३ च्या मुंबई बोंब स्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमन यांच्या फाशीच्या शिक्षेविषयी काँग्रेस नेत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यातलेच एक आघाडीचे नाव म्हणजे आमदार अस्लम शेख या नेत्याने याकूब मेमनच्या फाशीला पत्र लिहून विरोध दर्शवला होता.नंतर अस्लम शेख यांनी काँग्रेस पक्ष सोडून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली होती. अस्लम यांनी याकुब मेमनच्या फाशीला विरोध केला असला तरी नंतर याकुबला ३० जुलै २०१५ रोजी नागपूर तुरुंगात फाशी देण्यात आली.मात्र काँग्रेसच्या विरोधामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे भाजपने काँग्रेसवर टीका केली होती. भाजपचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या या वक्तव्यांना “अविचारपूर्ण आणि राजकीय प्रेरित” म्हटले होते तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती.
एकूणच १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनी भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून आपली छाप सोडली आहे. फारुख टकला यासारख्या व्यक्ती हा त्या काळात केवळ दाऊदचा सहकारी नव्हता, तर एक असा माणूस होता, ज्याने एका देशविरोधी कारवायेला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. त्याच्या अटकेनंतर, भारताच्या तपास यंत्रणांना या प्रकरणातील आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली. पण आजही, या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानी संरक्षणात असल्याची शक्यता वर्तवली जाते, आणि त्याला भारतात आणणे अजूनही एक मोठे आव्हानच ठरते आहे भारत सरकार त्यालाही भारतात आणेल अशी आशा आहे.
Dawood Ibrahim's aide Farooq Takla brought to Mumbai after being deported from Dubai. He will be produced before TADA court in Mumbai. He had fled from India after 1993 blasts and is being questioned by CBI. A Red Corner Notice was issued against him in 1995. pic.twitter.com/bW5Kh5bcb9
— ANI (@ANI) March 8, 2018