भारताने आपली दहशतवादविरोधी भूमिका एकदा स्पष्ट करत पाकिस्तानवर काल रात्री मोठी कारवाई केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मध्यरात्रीनंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. तीन दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त करत भारताने दहशतवादाला जशास तसे उत्तर दिले आहे.
यावेळी राफेल आणि सुखोई लढाऊ विमानांचा वापर करत मुझफ्फराबाद, सियालकोट, कोटली, गुलपूर, भुनेवाल, मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी तळांवर हॅमर आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे.
पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर धर्म विचारुन गोळीबार केला होता. त्या भ्याड हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली होती. पाकड्यांना जशास तसं उत्तर द्यावं, अशी मागणी भारतीयांकडून केली जात होती. तसेच पंतप्रधान मोदी यांनीही आपण चोख प्रत्युत्तर देऊ अशी घोषणा केली होती. आज अखेर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत शेजाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसवर अचूक निशाणा साधला आहे. तसेच बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले आहे. 1971 च्या युद्धानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त हल्ला केला आहे.
ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी होती. यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने लक्ष्यांची निवड व कारवाईची पद्धत ठरवताना अत्यंत संयम दाखवला असल्याचेही समोर आले आहे.