पहलगाम येथे हिंदूंवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेय. जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. देश न्यायाची मागणी करत होता. याचदरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू सुकेपर्यंत पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केलीये.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताकडून एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. ही कारवाई ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आली. रात्री दोनच्या सुमारास भारताकडून ही कारवाई झाली आहे. भारताच्या या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तीनही दलांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. १९७१ नंतर ही पहिली वेळ आहे जेव्हा भारताच्या तीनही दलांनी एकत्रितपणे पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली.
भारताने पहलगाम हल्ल्याच्या १५ नंतर ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. भारताने आज केलेल्या एअरस्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर आजच्या या लेखात आपण पाकिस्तान विरुद्ध भारताने सुरुवातीपासून काय-काय पाऊले उचलली याचा आढावा घेणार आहोत.
पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसा रद्द
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत देश सोडून पाकिस्तानात परत जाण्याचे आदेश दिले. सोबतच पाकिस्तानी नागरिकांना दिली जाणारी व्हिसा सेवा देखील तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अटारी चेक पोस्ट बंद
भारताकडून १ मे रोजी आणखी एक कारवाई करण्यात आली. यात अटारी-वाघा सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली. पंजाबमधील अमृतसरपासून २८ किलोमीटर अंतरावर असलेली अटारी सीमा ही भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारासाठी सध्या खुली असलेली एकमेव जमीनी सीमा होती. दोन्ही देशात तणाव काय असतानाही अटारी सीमा वस्तू आणि लोकांसाठी दीर्घकाळ एक मार्ग म्हणून काम करत होती.
सिंधू पाणी करार निलंबित
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी मोठे पाऊल उचलत भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित करण्यात आला असल्याचे भारताकडून सांगण्यात आले. सिंधू नदीचे ९० टक्के पाणी पाकिस्तानला मिळत होते. मात्र, हा करार थांबवल्यानंतर पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
पाकिस्तानी लष्करी सल्लागारांची हकालपट्टी
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश दिला.
डिजिटल स्ट्राईक
केंद्र सरकारने भारतात चालणाऱ्या आघाडीच्या पाकिस्तान यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली.सोबतच अनेक मोठ्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंद करण्यात आले.
भारतीय बंदरांमध्ये पाकिस्तानी जहाजांची परवानगी रद्द
भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर देखील बंदी घातली, तर भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरांवर जाण्यासही बंदी घातली.
पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी
सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या व निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात आणि वाहतुकीवर तात्काळ बंदी घातली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात २४ एप्रिल रोजी अटारी येथील एकात्मिक चेक पोस्ट (ICP) थेट व्यापार स्थगित केल्यानंतर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
एअर स्ट्राईक
७ मे रोजी भारताने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मध्यरात्रीनंतर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केले. मुझफ्फराबाद, सियालकोट, कोटली, गुलपूर, भुनेवाल, मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी तळांवर हॅमर आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे.