Operration Sindoor: २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हळहळ व्यक्त करत होता. त्यामुळे या हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. अखेर ज्या क्षणांची प्रतीक्षा भारतीय करत होते अखेर तो क्षण उजडलाच. भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारताकडून हा यशस्वी स्ट्राईक करण्यात आला आहे. या यशस्वी स्ट्राईकनंतर आता पाकिस्तानसह चीन आणि अमेरीकेकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर विविध देशांच्या प्रतिक्रिया:
– भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानमध्ये भ्याड हल्ला केला. आता याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे. पाकिस्तानची संपूर्ण जनता पाकिस्तानी सैन्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. भारताशी कसा सामना करायचा, हे पाकिस्तानी सैन्याला ठाऊक आहे.
-चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोन्ही देशांना आवाहन करतो.
– पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला लाजिरवाणी बाब आहे असा उल्लेख करत भारत बदला म्हणून काहीतरी अॅक्शन घेणार, असा अंदाज सगळ्यांना होता, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच “भारत पाकिस्तान यांच्यात अनेक काळापासून संघर्ष सुरू आहे. अनेक वर्ष नाही तर अनेक शतकांपासून भारत पाकिस्तान संघर्ष सुरू आहे. आता मी आशा करतो की, हे सगळे लवकर संपावे.”