जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. ७ एप्रिला भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई केली. भारताने केलेल्या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. ही कारवाई भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल तीन दलांनी मिळून संयुक्तपणे कारवाई केली. भारताकडून ही कारवाई रात्री १.०५ च्या दरम्यान करण्यात आली. या ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती भारत सरकारने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर भारत सरकारने सकाळी दहाच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन याबाबत दिली आहे. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या देखील उपस्थित होत्या. या परिषदेत पाकिस्तानात केलेल्या कारवाई संदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हवाई दलातील व्योमिका सिंग त्यांच्यासोबत लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली आहे.
या कारवाईवर प्रथम परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ला हा 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. हा हल्ला पाकिस्तानातून चालणाऱ्या लष्कर-ए-तैयबाने केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवेदनातून या संघटनेचा उल्लेख काढून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यावरून हे सिद्ध होते की, पाकिस्तानचे या संघटनेशी संबंध होते आणि हा हल्ला त्यांच्या प्रेरणेने झाला होता.
पाकिस्तानला दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे. 23 एप्रिल रोजीच भारत सरकारने सिंधू पाणी करार थांबवण्यासारखी अनेक कठोर पावले उचलली होती. यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट भारतावर आरोप केले. अशा परिस्थितीत भारताने प्रत्युत्तर देणे योग्य मानले. भारताने सीमापार दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई केली आहे.
या कारवाई फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष करण्यात आले आहे. आम्ही यापूर्वीही पाकिस्तानला कळवले होते की लष्कर आणि जैशचे दहशतवादी अड्डे त्यांच्या भूमीतून कार्यरत आहेत. यानंतरही पाकिस्तानने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. अशा परिस्थितीत, ही कारवाई करणे गरजेचे होते.
https://x.com/BJP4India/status/1920024720763978191
पुढे भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती देताना सांगितले, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही यावेळी लक्ष्य करण्यात आले. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. पुढे त्यांनी पाकिस्तानला इशारा देत जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्यांना योग्य प्रतित्युर दिले जाईल असे म्हटले आहे.