Masood Azhar: भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. अर्थातच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या १०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या ९ दहशतवाद्यांचे अड्डे कारवाई करून नष्ट केले आहेत. या नऊ ठिकाणांपैकी एक जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरचे घर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये मसूद अझरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. परंतु कारवाईच्या वेळी मसूद अझर स्वतः घरी उपस्थित नव्हता, त्यामुळे तो बचावला आहे. उपलब्ध माहितीनुसार ठार झालेल्या सदस्यांमध्ये मसूदची पत्नी, त्याचा मुलगा आणि त्याचा भाऊ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत असलेला मसूद अझरचा भाऊ रौफ असगर देखील या कारवाईत ठार झाला आहे.
हल्ल्यानंतर मसूद अझरची प्रतिक्रिया:
हल्ल्यानंतर मसूद अझरने एक निवेदन जारी करून आपल्या कुटुंबातील १० सदस्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अझरने म्हटले आहे की, या कारवाईत ५ मुलांचा आणि काही महिलांचा मृत्यू झाला असून, त्याचा मेहुणाही मारला गेला आहे. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर अझरने म्हटले आहे की, “मी पण मेलो असतो तर बरे झाले असते, ना पश्चात्ताप ना निराशा.”
मसूद अझर नेमका कोण आहे:
मसूद अझर हा ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २०१९ मध्ये त्याला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित केले होते. तसेच तो भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतही समाविष्ट आहे. तो बऱ्याच काळापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे, असे स्पष्ट झाले आहे. आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी तो नवीन मदरशांची स्थापना करण्याची योजना आखत होता. त्यामुळेच त्याच्या घराला लक्ष्य केले गेले.