Operration Sindoor: २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हळहळ व्यक्त करत होता. त्यामुळे या हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. अखेर ज्या क्षणांची प्रतीक्षा भारतीय करत होते अखेर तो क्षण उजडलाच. भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारताकडून हा यशस्वी स्ट्राईक करण्यात आला आहे.
पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील पुण्यात राहणाऱ्या कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला होता. गनबोटे हे कुटुंबीयांसह काश्मीरला फिरायला गेले होते. पर्यटकांवर गोळ्या झाडल्यानंतर दहशतवाद्यांनी काही महिलांना म्हटले होते की, “मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केले”. आता भारताकडून यशस्वी स्ट्राईक झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या या वाक्यावर गनबोटे यांच्या पत्नीने संगीता गनबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत समर्पक नाव आहे. मोदींनी अत्यंत योग्य पाऊल उचचले आहे. दहशतवादी म्हणाले होते की, मोदीला जाऊन सांगा आम्ही काय केले आहे ते, त्याला आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता पाकिस्तानला चांगला धडा मिळाला आहे. जर अजूनही त्यांनी धडा घेतला नसेल तर मोदी याहून कठोर पावले उचलतील अशी खात्री आहे.” दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप विवाहित महिलांचे कुंकू पुसले गेले होते, त्यामुळेच या कारवाईला ऑपरेशन सिंदूर नाव दिले आहे.