Operration Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. अर्थातच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या १०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या ९ दहशतवाद्यांचे अड्डे कारवाई करून नष्ट केले आहेत.
आता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे. “हनुमानाने रावणाच्या लंकेतील अशोक वाटिका उद्धवस्त करताना जे केले तेच भारतीय सैन्याने केले. ज्यांनी आमच्या निरापराधांना मारले त्यांनाच आम्ही मारले. सैन्याने कोणत्याही नागरी वस्तीला लक्ष्य केले नाही. भारतीय सैन्याने हनुमानाच्या आदर्शाचे पालन केले असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.”
भारतीय सैन्याने अद्भुत शौर्य आणि पराक्रमाचे उदाहरण देत नवा इतिहास रचला आहे. भारतीय सैन्याने अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलतेने ही कारवाई केली आहे. जे टार्गेट ठरवले होते ते अत्यंत अचुकतेने नष्ट केले आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पाठिंबा आणि पुरेसा वेळ दिल्याबद्दल मोदींचे आभारही मानले आहेत.