Naxalism: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध तणावाखाली होते. त्यामुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवरती आल्या आहेत. भारताने पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यातच आता सी-60 कमांडोंच्या पथकाने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी आज मोठी कारवाई करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. नक्षलवाद्यांचा हा तळ सी-60 कमांडो पथकाने आज पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत काही नक्षलवादी ठार किंवा जखमी झाले असतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या कारवाईत कमांडो पथकाला नक्षलवाद्यांचे एक मॅगझीन, एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल तसेच जिवंत काडतुसे,एक रेडिओ, डिटोनेटर आणि वॉकीटॉकी चार्जरसह नक्षलवाद्यांचे इतरही काही साहित्य सापडले आहे.
आज सकाळी जंगल परिसरात असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर, सी-60 जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती. परंतु अखेर सी-60 कमांडो पथकाला मोठे यश मिळाले. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा झटका बसला आहे.