War: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षात विविध अस्त्र-शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा विषय बनला आहे. काळाच्या ओघात जसजसे तंत्रज्ञान पुढे जात आहे तसे तंत्रज्ञानाचा वापर होऊन युद्धाचे स्वरूप देखील बदलत आहे. आजच्या लेखात आपण बदललेल्या युद्धाच्या स्वरूपाचा आढावा घेऊयात.
पारंपारिक युद्ध म्हणजे काय:
पारंपारिक युद्धात सर्वप्रथम युद्ध जाहीर केले जाते. दोन्ही बाजू एकमेकांविरुद्ध शस्त्रे वापरून युद्धभूमीवर एकमेकांसमोर येतात, या शस्त्रांमध्ये सहसा जैविक, रासायनिक किंवा आण्विक पदार्थांचा समावेश नसतो. पारंपारिक युद्धांमध्ये सैन्य, तोफा, युद्धनौका, विमाने वापरली जातात. पारंपारिक युद्धांमध्ये अनेकांचे बळी जातात. पूर्वीची बहुतांश युद्ध ही पारंपारिक पद्धतीने झाली आहेत.
हवाई मार्गातून होणारी युद्ध:
आता पूर्वीसारखे पारंपारिक युद्धाप्रमाणे प्रत्यक्ष किंवा समोरासमोर जाऊन युद्ध लढण्याचे दिवस राहिले नाहीत. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे हवेतून जमिनीवर केलेला अचूक मारा ही पद्धत सध्या युद्धात वापरली जात आहे. शत्रू राष्ट्रात प्रत्यक्ष न जाता केले जाणारे हवाई हल्ले आणि डागली जाणारी घातक क्षेपणास्त्रे अनेक अर्थाने महत्त्वाची आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच पाकिस्तान भारताने एकमेकांवर केलेले हवाई हल्ले. तसेच तिकडे इस्त्राईल देखील हवाई हल्ल्याचा वापर करत आहे.
तंत्रज्ञानामुळे बदललेले युद्धाचे स्वरूप:
-अलीकडच्या काळात युद्धात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. युद्धात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे युद्धामध्ये मानवतावादी दृष्टिकोन वाढला आहे.
– मानवतावादाचा मुद्दा लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करत भारताने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती घेऊयात. ऑपरेशन सिंदूरंध्ये भारताने कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांचे नुकसान होऊ नये तसेच सामान्य माणसांना हानी पोहचू नये म्हणून ऑपरेशन सिंदूरची कारवाई काळजीपूर्वक आणि नियोजित केली होती. त्यासाठी भारताने ‘लोइटरिंग म्युनिशन’ ही एक युद्ध सामग्री वापरली होती. लोइटरिंग म्युनिशन, ज्याला आत्मघाती ड्रोन, कामिकाझे ड्रोन किंवा एक्सप्लोडिंग ड्रोन म्हणून देखील ओळखले जाते.
-सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘लॉयटरिंग म्युनिशन्स’ म्हणजे अशी ड्रोन्स जी त्यांच्या टार्गेटच्या जवळ हवेत तरंगत राहतात. या ड्रोन्सवर दारुगोळा असतो. हल्ल्याचे टार्गेट स्पष्ट करण्या आले की, हे ड्रोन दारुगोळ्यासकट टार्गेटवर जाऊन धडकते आणि स्फोट होतो.यातील काही ड्रोन एआयद्वारे चालवली जातात. म्हणजेच त्यासाठी मानवी मार्गदर्शनाची देखील जास्त गरज पडत नाही.
अर्थातच अलीकडच्या युद्धामध्ये एआयचा देखील वापर होताना दिसत आहे.
हायब्रीड युद्ध:
रशिया-युक्रेन संघर्ष आणि हमास-इस्त्रायल ही दोन युद्धसुद्धा तंत्रज्ञानाच्या आणि लष्करी शक्तीच्या वापराचे साक्षीदार आहेत. या दोन युद्धात लष्करी शक्तींचा देखील वापर झाला आणि आधुनिक तंत्रज्ञाना देखील झाला.त्यामुळ रशिया-युक्रेन आणि हमास-इस्त्रायल ही दोन युद्ध हे हायब्रीड युद्धाचे एक उत्तम उदाहरण ठरले.
सायबर युद्ध:
अलीकडच्या काळात सायबर युद्ध नावाचा एक नवीन प्रकार उदयास आला आहे.
सायबर युद्ध म्हणजे एखाद्या देशाने दुसऱ्या देशाची अंतर्गत माहिती चोरणे. जी त्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.
– पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि इतर काही देशांकडून भारतावर तब्बल दहा लाख सायबर हल्ले झाले आहेत.
-रशिया-युक्रेन युद्धादरम्यानसुद्धा दोन्ही बाजूने सायबर युद्ध रणनिती म्हणून वापरण्यात आले.
– त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक राष्ट्रांनी आणि लष्करी संघटनांनी संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी सायबर संरक्षण युनिट्स विकसित केल्या आहेत.
रशिया-युक्रेन संघर्ष आणि हमास-इस्त्रायल संघर्ष ही आपल्या डोळ्यासमोर उलगडत असलेली दोन युद्ध, तंत्रज्ञानाच्या वापराचे साक्षीदार आहेत. जे काही प्रमाणात बऱ्यापैकी प्रगत आहेत आणि दुसऱ्या बाबतीत म्हणायचे तर इतके अत्याधुनिक देखील नाहीत. तरीदेखील क्षमतांचे दोन्ही संच मग ते प्राथमिक असोत किंवा प्रगत, घातक आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहेत.
असममित युद्ध(Asymmetric Warfare):
असममित युद्ध म्हणजे दोन प्रतिस्पर्धकांच्या लष्करी सामर्थ्यात मोठा फरक असणे. या प्रकारच्या युद्धांमध्ये एक बाजू अधिक शक्तिशाली असते. तर दुसरी बाजू कमी शक्तिशाली किंवा अपारंपरिक पद्धत वापरते. ‘दहशतवादी हल्ले’ हा असममित युद्धाचाच एक प्रकार आहे.
छुपे युद्ध:
प्रत्यक्ष युद्ध न करता शत्रू राष्ट्रातील दहशतवादी, फुटीर किंवा बंडखोर यांना बळ देऊन त्यांच्या माध्यमातून शत्रूला क्षती पोहचविणारे छुपे युद्ध हे सुद्धा अतिशय प्रभावी आणि चिंताजनक असते. नुकताच झालेला पहलगाम हल्ला हे अशा छुप्या युद्धाचेच उदाहरण आहे.
व्यापार युद्ध:
व्यापार युद्ध म्हणजे दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील आर्थिक संघर्ष असतो. व्यापरा युद्धाच दोन देश एकमेकांच्या व्यापाराला किंवा अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्यासाठी व्यापार शुल्क,आयात निर्बंध लावतात . याचे उदाहरण म्हणजे सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला व्यापार संघर्ष.
दरम्यान, केवळ एकमेकांच्या सैनिकांत संघर्ष होणे, एवढे वाक्य आता युद्धाच्या संकल्पनेसाठी पुरेसे नाही. आज जगात युद्धाचे अनेक नवीन प्रकार उदयास आल्याचे पाहायला मिळत आहे.