Inida-Turkey: भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान अमेरिका, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक राष्ट्रांनी भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला होता. मात्र तुर्की आणि अझरबैजान या देशांनी मात्र पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत, भारताच्या विरोधात भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर सध्या भारतातील पर्यटकांनी तुर्कस्तानच्या पर्यटनावर बहिष्कार टाकला आहे. तसेच भारत तुर्कस्तानचे व्यापारसंबंध सुद्धा तणावाखाली आल्याचे दिसत आहे. त्यातच आता तुर्कीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
कारण नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने ‘सेलेबी एव्हिएशन'(Celebi Aviation) या तुर्की कंपनीचा भारतातील ग्राउंड हँडलिंग परवाना तात्काळ रद्द केला. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे तुर्कीला आता मोठा धक्का बसला आहे.
सेलेबी एव्हिएशन कंपनी काय आहे:
‘सेलेबी एव्हिएशन’ ही तुर्की कंपनी विमानतळावर खासगी ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1958 मध्ये झाली आहे. ही कंपनी व्हीलचेअर सहाय्य, रॅम्प सेवा, कार्गो व वेअरहाउस व्यवस्थापन, आणि विमानतळ लाउंज सेवा पुरवते. सध्या ही कंपनी 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय ठिकाणी कार्यरत आहे.
भारतात कुठे कुठे सेलेबी एव्हिएशनची सेवा सुरू होती:
सेलेबी एव्हिएशनने कंपनीने भारतात सर्वप्रथम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा सुरू केली होती. त्यानंतर बंगळूर, दिल्ली, गोवा, हैदराबाद,कोचीन, कन्नूर, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कंपनीने आपली सेवा सुरू केली होती. विशेष म्हणजे ही कंपनी दरवर्षी भारतात ५८,००० उड्डाणे व्यवस्थापित करते. त्यामुळे आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून कंपनीवर शंका निर्माण झाली आहे.
भारताने परवाना रद्द केल्यानंतर सेलेबी एव्हिएशनची प्रतिक्रिया:
सेलेबी एव्हिएशनने कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतातील त्यांची कार्यप्रणाली पारदर्शक आहे. आमचा कोणत्याही परदेशी सरकारशी किंवा राजकीय संघटनांशी संबंध नाही. आम्ही केवळ व्यावसायिक सेवा पुरवतो आणि भारतात दीर्घकाळ कार्यरत राहण्याची बांधिलकी जपतो, असा देखील दावा कंपनीने केला आहे. मात्र भारताने परवाना रद्द केल्याबद्दल त्यावर कंपनीने कोणतीही थेट प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
ड्रोन हल्ल्यात तुर्कीने केली पाकिस्तानला मदत:
भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून जे भारतावर ड्रोनहल्ले होत होते. या ड्रोन तंत्रज्ञानामध्ये तुर्कस्तानचा सहभाग असल्याचा संशय भारताच्या सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला होता. एवढेच नाहीतर पाकिस्तानला मदत करण्यासाठी तुर्कस्तानकडून तुर्की कार्यकर्त्यांचा पाकिस्तानला पुरवठा केल्याचे देखील समोर आले आहे. तसेच २०२० पर्यंत तुर्की पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार बनला होता.
पाकिस्तानला ड्रोन तंत्रज्ञान पुरवून तुर्कस्तान भारताच्या सीमांवर हल्ल्यांचे एकप्रकारे साधन पुरवत आहे आणि तुर्कस्तानची ही कृती अप्रत्यक्षपणे युद्धाला प्रोत्साहन देण्यासारखी आहे. त्यामुळे अशा देशातील कंपन्यांना भारतातील संवेदनशील संस्थांमध्ये काम करण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे.
खरेतर सेलेबी कंपनी भारतात नोंदणीकृत आहे. तसेच या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाते. परंतु तरीही हे लोक तुर्की वंशाचे असल्याने काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण तुर्की वंशाचे कर्मचारी विमानतळांवर संवेदनशील आणि उच्च-सुरक्षा यंत्रणेमध्ये काम करतात.
दरम्यान, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसवरील सुरक्षा मंजुरी रद्द करणे हा केवळ व्यवस्थापकीय किंवा व्यवसायिक दृष्टिकोणातून महत्वाचा निर्णय नाही तर या या निर्णयामागे भारत-तुर्कस्तानमधील वाढत्या तणावाची पार्श्वभूमी आहे. कारण तुर्कस्तान इस्लामिक जगतात नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा बाळगत असल्याचे दिसू लागले आहे. तसेच तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर काश्मिर प्रश्नावरती स्पष्टपणे पाकिस्तानला पाठिंबा देत भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे आता भारताने देखील तुर्कस्तानविरोधात स्पष्टपणे कणखर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. अर्थातच हा निर्णय भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि मुत्सद्देगिरीच्या धोरणाचा भाग आहे.