लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विरोधी पक्षांनी स्थापन केलेली ‘इंडिया’ आघाडी सध्या दिशाहीनतेच्या संकटात सापडली आहे. या आघाडीच्या भविष्यावर आता तिच्या प्रमुख घटक पक्षातील नेतेच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या भाषणातून ‘इंडी’ आघाडीच्या भविष्यावर साशंकता व्यक्त केली. माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद आणि मृत्युंजय सिंह यादव यांनी लिहिलेल्या ‘कॉन्टेस्टिंग डेमोक्रॅटिक डेफिसिट’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की “इंडी आघाडी अजून अबाधित आहे का? याची मला खात्री नाही. तिचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही.”
Even Congress veteran P. Chidambaram now doubts the future of the Congress, questions the shaky INDI alliance, and admits BJP is a strong, united force.
Will the Congress high command now attack him too for saying what the whole country already knows? pic.twitter.com/kOljxHc2PM
— Shanthi Kumar (@BJPShanthikumar) May 16, 2025
या विधानाने काँग्रेसच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासहिनतेचे ढग दाटले आहेत. निवडणुकीपूर्वी विरोधकांची एकजूट साधण्यासाठी काँग्रेसने मोठा गाजावाजा करत ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली होती. मात्र निकालानंतर सर्वांत मोठ्या पक्षाची जबाबदारी घेण्याऐवजी काँग्रेसकडून केवळ आत्मपरिक्षणाचे ढोंग सुरु आहे. चिदंबरम यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याकडून अशी निराशाजनक प्रतिक्रिया येणे हे काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळाचे आणि दिशाभूल धोरणाचे स्पष्ट लक्षण आहे.
काँग्रेसचे नेतृत्व, अपेक्षा आणि वास्तव
काँग्रेस स्वतःला या आघाडीचा मुख्य आधार मानते, मात्र आघाडीतील अन्य घटक पक्षांना विश्वासात घेण्याची, त्यांच्यासोबत समन्वय राखण्याची काँग्रेसची क्षमता सातत्याने अपयशी ठरते आहे. केवळ दिल्लीतील चर्चांवर आधारित युती तयार करणे आणि निवडणूक आल्यावर मतांची बेरीज शोधणे, ही काँग्रेसची एक जुनी सवय झाली आहे. चिदंबरम यांनीही याच मुद्द्याकडे लक्ष वेधताना म्हटले की, “युती पाच वर्षे टिकवावी लागते, ती निवडणुकीपुरती नसते.” हे विधान काँग्रेसच्या एकंदरीत ढिसाळ आणि निवडणूकपुरत्या राजकारणावरच बोट ठेवते.
भाजपा, संघटित यंत्रणा आणि काँग्रेसची विस्कळीत मोहीम
भाजपाबद्दल बोलताना चिदंबरम म्हणाले की, देशाच्या इतिहासात भाजपसारखा संघटित राजकीय पक्ष कधीच निर्माण झाला नाही. हा फक्त एक पक्ष नाही, तर एक यंत्र आहे. त्यामागे आणखी एक यंत्र आहे. ते एकत्रितपणे देशातील संस्थांवर नियंत्रण ठेवतात. निवडणूक आयोगापासून ते पोलिस ठाण्यांपर्यंत. लोकशाहीमध्ये ही शक्य तितकी शक्तिशाली संघटना आहे. हे कबूल करताना त्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक कमकुवतीवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले आहे. भाजप जिथे गावपातळीपर्यंत संघटन उभारत आहे, तिथे काँग्रेसच्या अनेक राज्यांत कार्यकर्तेच गायब आहेत. ‘इंडी’ आघाडीचा आत्मा समजल्या जाणाऱ्या काँग्रेसकडे ना स्पष्ट रणनीती आहे, ना तळागाळातील संपर्क. मग अशा पक्षाच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर प्रभावी विरोधकांची आघाडी उभी राहणार कशी?
‘इंडी’च्या अपयशाची मुळं काँग्रेसमध्ये?
‘इंडी’ आघाडीचा पराभव हा एकट्या मतांचे विभाजन किंवा प्रचाराच्या अक्षमतेमुळे नाही, तर काँग्रेससारख्या पक्षाच्या अनिश्चित, विस्कळीत आणि नेतृत्वशून्य धोरणामुळे झाला आहे. चिदंबरम यांनी जरी त्यांच्या विधानातून काळजी व्यक्त केली असली, तरी ती काळजी स्वतः काँग्रेसने उभी केलेल्या परिस्थितीची आहे, हेही विसरून चालणार नाही.
काँग्रेसच्या या अनिश्चिततेला बळकटी देणारे काँग्रेसमधील इतर नेत्यांचे सार्वजनिक वक्तव्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत:
1. शशी थरूर– काँग्रेसचे माजी मंत्री आणि जागतिक दृष्टिकोन असलेले थरूर हे वेळोवेळी पक्षाच्या धोरणांवर आणि निर्णयप्रक्रियेवर टीका करत आले आहेत. नुकतेच त्यांनी भारत-पाकिस्तान संदर्भात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे समर्थन केले, ज्यावर काँग्रेसने त्यांच्यावर ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडल्याचा आरोप केला. यावर थरूर म्हणाले की, “मी भारतीय नागरिक म्हणून माझे मत व्यक्त केले, ते काँग्रेस पक्षाचे मत नव्हते.” याशिवाय, काँग्रेसच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेवर त्यांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहेत.
2. मणिशंकर अय्यर– काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही राहुल गांधींवर आणि नेतृत्वाच्या क्षमतेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले होते की, “राहुल गांधींनी काँग्रेसची सल्लागार यंत्रणा नष्ट केली आहे.” तसेच, काँग्रेसची निर्णयप्रक्रिया अपारदर्शक असल्याचीही टीका त्यांनी वारंवार केली आहे.
3. कपिल सिब्बल – G-23 गटाचे सदस्य असलेले सिब्बल यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर तीव्र टीका करत, पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. २०२१ मध्ये जम्मूमध्ये झालेल्या ‘शांती संमेलनात’ त्यांनी सांगितले की, “काँग्रेस पक्ष कमजोर होत आहे, आणि लोकांना पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर विश्वास ठेवायला आता कारणच उरलेले नाही.”
4. अनिल शास्त्री – लाल बहादुर शास्त्रींचे पुत्र असलेले अनिल शास्त्री यांनी काँग्रेसने आपल्या अनुभवाचा योग्य उपयोग न केल्याची तक्रार केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “पक्षात निर्णय घेताना वरिष्ठांचे मत विचारात घेतले जात नाही.”
‘इंडि’ आघाडीची असफलता केवळ बाह्य राजकीय दबावामुळे नव्हे, तर तिच्या मुख्य आधारस्तंभ असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वातील गोंधळ, आतल्या विरोधी सूरांशी संवादाचा अभाव आणि दीर्घकालीन रणनीतीच्या अभावामुळे झाली आहे. शशी थरूर, कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर यांसारख्या अनुभवी नेत्यांची टीका ही केवळ असंतोष नव्हे, तर काँग्रेसला अंतर्मुख होण्यासाठी मिळालेला इशाराही आहे. या परिस्थितीत, ‘इंडी’ आघाडीचे भविष्य काँग्रेसच्या आत्मचिंतनापेक्षा कृतीत किती बदल घडतो, यावरच अवलंबून असेल.