पुणे: सध्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी काही मालिका बंद करायची वेळ वाहिन्यांवर आली असतानाच दुसरीकडे नवनवीन मालिका धुमधडाक्यात सुरूही होत आहेत आणि या नव्या मालिकांना प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद लाभतो आहे. अशाच मालिकांपैकी ‘जय जय शनिदेव’ नावाची धार्मिक मालिका सोनी मराठी वर दिमाखात सुरू झाली असून सूर्यपुत्र शनिदेवांची महागाथा उलगडत नेणा-या, या मालिकेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपल्या धर्मग्रंथात शनिचा उल्लेख देवता स्वरूपात केलेला आहे. त्याभोवती गुंफलेलेल्या रहस्यमय कथा, दंत कथा, शनिच्या काहीशा उग्र स्वरूपाला वेढून असलेले गूढतेतचे वलय, याचे वर्णन आपल्या शिवपुराण इत्यादी ग्रंथातून केलेले आढळते. तशाच स्वरूपाची प्रतिमा लोकांमध्येही प्रचलीत आहे. यात शनिला न्यायाची देवता असे म्हटले असूनही “शनि मागे लागला” असे सर्व सामान्यपणे म्हटले जाते. यातून लोकांच्या मनात शनिबद्दल एक प्रकारची भीती बसलेली दिसते. प्रत्यक्ष मात्र या नकारात्मक चित्रापेक्षा शनीदेवांचे चरित्र मालिकेमध्ये वेगळ्या स्वरूपात रेखाटलेले आहे.
भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देणारा ; तसेच, प्रयत्नवादाची शिकवण देणारा असे वर्णन पुराणांमध्ये आलेले आहे. याच गुण वैशिष्ट्यावर आधारित “जय जय शनिदेव” या मालिकेत प्रकाश टाकण्यात येत आहे. शनिदेव या मुख्य व्यक्तीरेखेच्या माध्यमातून विविध कथांद्वारे सारे “शनि महात्म्य” मनोरंजकपणे प्रेक्षकांसमोर येणार आहे. “शनिदेव” ही भूमिका संकेत खेडकर हा तरूण गुणी अभिनेता साकारत असून त्याने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे.
धार्मिक पौराणिक मालिका लिहीण्यात हातखंडा असलेले प्रसिध्द लेखक संतोष आयाचित यांच्या “येल्लकोटी” या निर्मिती संस्थेमार्फत ही मालिका सादर होत आहे. “शनि महात्म्य” कथेत सर्वात महत्वाची व्यक्तीरेखा आहे ती “राजा विक्रमादित्य”. या राजाला रावाचा रंक करून जीवनातील सत्याचे दर्शन घडवणे व त्याची खडतर परीक्षा घेऊन त्याला जन्माचा धडा शिकवणे, असे कथानक अनेक प्रसंगातून रंगवताना मानवी जीवनमूल्यांना नेमका स्पर्श करण्यात आला आहे. विक्रमादित्याची ही आव्हानात्मक भूमिका कपिल होनराव या अभिनेत्याने साकारली आहे.
राणी पद्मसेनेच्या भूमिकेत अंकिता लोंढे ही अभिनेत्री असून त्रिशूल मराठे, महादेव आणि रूही तारू, देवी पार्वतीची भूमिकेत आहेत. पुण्याची गुणी नाट्यअभिनेत्री अनुश्री दुर्वे विक्रमादित्याच्या आईच्या भावपूर्ण भूमिकेत आपल्या अभिनयाचे रंग भरत आहे, तर प्रसन्न केतकर, शरद गुरव, रेखा सागवेकर, कुणाल गाभारे, अक्षय पाटील ईत्यादी जुने-नवे कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत झळकले आहेत. वास्तविक खगोल शास्त्रानुसार शनि या ग्रहाचे ब्रह्मांडातील स्थान, त्याचे गडद निळा रंगाचे आकर्षक रूप आणि त्याच्याभोवतीचं रहस्यमय गोल कडं, याबद्दल खगोल अभ्यासकांना खूप कुतूहल आहे.त्यानुसार याचा शास्त्रीय स्तरावर सखोल अभ्यास सविस्तरपणे सुरू असतानाच टीव्हीच्या पडद्यावर कुटुंबातील आबालवृध्दांनी एकत्र बसून पाहता येईल, अशी ही मालिका प्रेक्षकांवर किती जादू करते आहे याची उत्सुकता आहे. जय जय शनिदेव’ सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9.30 वाजता सोनी मराठीवरून प्रसारित होते आहे.