राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे उद्या २७ जूनपासून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत पार पडणार आहे. तसेच राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार,१२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून,एकूण १३ दिवस अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील
14 व्या विधानसभेच्या आधीचे हे अधिवेशन असणार आहे. या शेवटच्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनीति आखल्याची माहिती समोर येत आहे.
उद्यापासूनचं अधिवेशन राज्य सरकारच्या निरोपाचे अधिवेशन असल्याचे म्हणत, ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे. तर, पुणे ड्रग्ज प्रकरणासाठी अधिवेशन रोखून धरणार, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे. तसेच, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी देखील राज्य सरकारचे भ्रष्टाचाराचे प्रकरण उकरून काढून ते आक्रमकपणे मांडा, अश्या सूचना नेत्यांना दिल्या असल्याचे संगितले जात आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आज सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता वांद्र्यातील ताज लँड हॉटेलला बैठक आयोजित करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची रणनिती काय असणार? यावरही चर्चा होणार आहे.
दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर असताना सरकार त्याबाबत गंभीर नसल्याचे सांगत विरोधकांनी हा बहिष्कार घातला आहे.