देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल उशिरादिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या बारीक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
युरोलॉजी विभागातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांना वयाच्या कारणास्तव एम्समध्ये दाखल करावे लागले आहे. . ते जवळपास दशकभर सक्रिय राजकारणापासून दूर होते. नुकतेच त्यांचे आणि पंतप्रधान मोदींचे छायाचित्र समोर आले होते. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते.
नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी एका औपचारिक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९६ वर्षीय अडवाणी यांना ‘भारतरत्न’ प्रदान केला होता . या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची, पाकिस्तान येथे जन्मलेले अडवाणी 1998 ते 2004 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये गृहमंत्री होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2002 ते 2004 दरम्यान त्यांनी देशाचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. आडवाणींनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सुरू केली. भाजपाची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अधिक अपडेट्स अद्याप समोर आलेले नाहीत. अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात.