पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढवण्यासाठी प्रक्रिया सुरु असून संरक्षण खात्याकडील तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. तसेच पुण्याच्या विकासाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. विस्तारसंदर्भात अपेक्षित लागणारी जागा संरक्षण खात्याची असल्याचेही त्यांना मोहोळांनी सांगितले.
तसेच पुणे विमानतळावर गेल्या दीड महिन्यांपासून एअर इंडियाचे विमान पार्किंग बेवर उभे असून त्यास दुरुस्तीसाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणून सदरील विमान दुरुस्ती होईस्तोवर संरक्षण खात्याच्या जागेत लावण्यासाठी (पार्किंग) परवानगी द्यावी, या संदर्भातही मोहोळ यांनी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.
आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खडकी कॅन्टोन्मेंटच्या जागेतील स्थानिकांच्या घरांचा भाडेकरार संपलेला असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा दीर्घमुदतीचा भाडेकरार लवकरच करण्यात यावा, ही मागणीही आपण केली असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.
या सर्व मागण्यांवर मा. राजनाथ सिंह यांनी सकारात्मकता दर्शविली असून यावर लवकरच निर्णय होईल,असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.